दत्ताजी भाले रक्तपेढीत काम करणाऱ्या भारत दांडगेंच्या मागे सध्या मोठी घाई आहे. ते सकाळी घरून निघतात, तेव्हा केव्हा परतणार,  ते त्यांना माहीत नसते. याचे कारण डेंग्यू संशयीत रुग्णांना द्यावयाच्या रक्तातील प्लेटलेट विघटनाचे काम ते करतात. परिणामी कधी चार तर कधी सहा तास अधिकचे काम त्यांना करावे लागते. गेल्या वर्षी जुलैमध्ये डेंग्यूच्या संशयीत रुग्णांसाठी ८०१ प्लेटलेटच्या पिशव्या पुरवाव्या लागल्या. या वर्षी रुग्णांची संख्या एवढी आहे की, आतापर्यंत १ हजार ८५८ प्लेटलेटच्या पिशव्या दिल्या गेल्या आहेत. रक्तदानानंतर सहा तासात रक्ताचे विघटन करून प्लेटलेट वेगळ्या कराव्या लागतात. परिणामी रक्तपेढय़ांवरील ताण वाढला आहे. शासकीय रक्तपेढीत तेवढी धावपळ नसली, तरी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात.
या वर्षी जुलै महिन्यात ९० तपासण्या करण्यात आल्या. यातील २७ जणांना डेंग्यू असल्याचे स्पष्ट झाले. सर्वसाधारणपणे ५० चाचण्या केल्यावर सरासरी ३ ते ७ रुग्णांना डेंग्यू दिसून यायचा. आता हे प्रमाण ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक झाले आहे. प्लेटलेट या शब्दाला मराठीत ‘बिंबिका’ म्हटले जाते. डास चावल्यामुळे या पेशींचे प्रमाण कमी होते. परिणामी रुग्णाचे इतर अवयव निकामी होऊ लागतात व रुग्ण दगावतो. अशा रुग्णांना केवळ प्लेटलेटच द्याव्या लागतात. प्लेटलेट तयार करण्यासाठी रक्तदान होणे अधिक गरजेचे असते. सहा तासांच्या आत रक्ताचे विघटन करण्यासाठी भारत दांडगेंसारखे अनेकजण कार्यरत आहेत.
याच रक्तपेढीतील तांत्रिक व्यवस्थापक सुषमा लाटकर म्हणाल्या की, सध्या आम्ही सर्वजण कमालीचे व्यस्त आहोत. दर दहा मिनिटांनी प्लेटलेट मागणीसाठी रुग्णांचे नातेवाईक येतात. डेंग्यूसदृश आजाराचे हजार ते बाराशे रुग्ण असावेत, असे सांगितले जाते. एका रुग्णाला प्लेटलेटच्या एका पिशवीसाठी ७५० रुपये खर्च येतो. औषधांचा खर्च वेगळा. एका रुग्णावर होणारा सरासरी खर्च ५ ते ७ हजार रुपयांच्या घरात जात असला, तरी सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे.  
महापालिकेकडे डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी केवळ १० धूरफवारणी यंत्रे आहेत. गाडीवर धूर फवारणी असणाऱ्या दोन यंत्रांपैकी एक बंद आहे. या यंत्रणांसाठी महापालिकेकडून केवळ १० लाख रुपयांची तरतूद ठेवण्यात आली. लागणारी औषधे राज्य सरकारकडून मिळतात, असे अधिकारी सांगतात. मात्र, ती किती आहेत, याची आकडेवारी उपलब्ध नाही.
शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील डॉ. गट्टाणी म्हणाले की, गेल्या काही दिवसांत केलेल्या रक्ताच्या तपासण्यांवरून रुग्णांची संख्या वाढली आहे. ९० जणांच्या रक्ताच्या तपासण्यांमध्ये २७ जणांना आजार झाल्याचे आढळून आले. आजार पसरण्याची तीव्रता वाढल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून मोठा पाऊस झाला नाही आणि कडक ऊनही पडत नाही. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे.