तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे चालविण्यात येणाऱ्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६ प्राध्यापक व एका कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशीही सुरू केली. या कारवाईमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली. अंतर्गत कामाच्या मूल्यांकनात आढळून आलेल्या विसंगतीतून ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी अनेक प्रकारे समज देऊनही कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा दिसून न आल्याने शनिवारी सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेऊन नोटिसा बजावल्या. पी. बी. भोसले, एम. के. नारायणकर, एस. बी. आखाडे, एन. आर. चव्हाण व पी. आर. गाडे हे प्राध्यापक व कर्मचारी सी. ए. घाडगे यांच्यावर निलंबनाचे हत्यार पाजळण्यात आले.
तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय ५ वर्षांपर्यंत सुस्थितीत चालविले जात होते. दहा वर्षांपूर्वी या महाविद्यालयाचा विद्यापीठात दबदबा होता. अनेक उत्तम प्रशासकांनी आपल्या कार्यकाळात गुणवत्ता व पायाभूत सुविधा प्राप्त करून लौकिक मिळवला. मात्र, गेल्या ५ वर्षांत अनेक कारणांनी महाविद्यालय वादाच्या भोवऱ्यात आहे. येथील अनुभवाचा वापर करून संधी साधून वरिष्ठ प्राध्यापकांनी आपल्या सोयीनुसार सोलापूर, पंढरपूर, पुणे आदी ठिकाणी प्राचार्य व वरिष्ठ पदांवर स्थलांतरण करून घेतले. डॉ. प्रवीण गेडाम व डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आपल्या काळात प्रशासनाला ताळ्यावर आणतानाच विद्यार्थीसंख्या कमी असल्याच्या कारणासह ७२ टक्के डी. ए. कमी करून २० टक्के करण्याचे पाऊल उचलले. काही कर्मचारी ७२ टक्के व १०७ टक्के डी. ए. साठी न्यायालयातही गेले आहेत.