तुळशी विवाह येत्या २५ नोव्हेंबरला असल्याने तुळशींना आकार दिला जात आहे. या तुळशीच्या मूर्तीना शेषाधारी विष्णू, गणेश, लक्ष्मी अशा मूर्ती कलाकार आकार देऊन रंगवीत असून त्यांना मागणीदेखील आहे. सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावातील सुरेश आर्टस मूर्ती कला केंद्राचे मालक सुरेश रुबजी हे तुळशीच्या मूर्तीना आकार देतात. चित्रशाळांतील कलाकारही ठिकठिकाणी तुळशीच्या लग्नाच्या पाश्र्वभूमीवर तुळशींना आकार देत आहेत. गोवा, कर्नाटक, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्य़ात तुळशीला मागणी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील चित्रकार सध्या तुळशी बनविण्यात व्यस्त आहेत. फायबर, सीमेंट, सीमेंट पेपर मॅक्स आदी अनेक इको फ्रेंडली मूर्ती बनविण्यात येतात. निगुडेत सुरेश रुबजी यांनी पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत बँकेतून अर्थ साहाय्य घेऊन या उद्योगात पुढाकार घेतला. त्यामुळे काहीजणांना ते रोजगार मिळवून देऊ शकले.

बारमाही आपल्याकडे काम असल्याचे सुरेश रुबजी म्हणाले, गणेश मूर्ती झाल्यावर दुर्गा देवी, सरस्वती देवी मूर्ती, नरकासुर मुखवटे, तुळशी, मंदिराचे कलश, गार्डन डेकोरेशन अशी विविध कामे कायमस्वरूपी असतात, असे त्यांनी सांगितले. मूर्ती कलाकारांना बारमाही काम असल्याने आपला जोडधंदा सांभाळूनही ते मूर्तिकला जोपासू शकतात, असे कलाकारांचे म्हणणे आहे.