जिल्ह्य़ातील करचुंडी येथे वादळ वाऱ्यासह आलेल्या पावसात गुरांच्या छावणीवर वीजप्रवाह असलेली तार तुटून पडल्याने २० जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. छावणीत तार पडली, त्या वेळी तेथे शेतकरी नव्हते. पावसामुळे तारेतील प्रवाह छावणी परिसरात पसरल्याने जनावरांचा मोठय़ा प्रमाणावर मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दुष्काळामुळे छावणीत आश्रयास आणलेली जनावरे अशाप्रकारे दगावल्याने पाच शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. जिल्ह्णाात दुष्काळी स्थितीमुळे पशुधन जगवण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या २७२ छावण्यांमध्ये ३ लाख ४ हजार पशुधन आश्रयाला आहे. काही दिवसांवर खरीप पेरणीचा मोसम येऊन ठेपला असला, तरी पाणी व चारा टंचाईमुळे छावण्यांमध्येच जनावरांसह शेतकरी थांबले आहेत.

बीड तालुक्यातील करचुंडी येथे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या मराठवाडा कृषी पशुसंवर्धन विकास संशोधन विज्ञान मंडळ, चांदेगाव संस्थेमार्फत जनावरांची छावणी चालवली जात असून यात जवळपास ६०० पेक्षा जास्त जनावरांची नोंद आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास करचुंडी परिसरात वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. या पावसात छावणीवरून गेलेली वीज तार तुटून छावणीवर पडली.

या वेळी वीजप्रवाह सुरू असल्यामुळे आणि पावसामुळे छावणीत सर्वत्र ओले असल्याने वीजप्रवाह पसरला आणि यात छावणीत बांधलेली २० जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली. काही वेळातच ही बाब लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी वीजप्रवाह बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. या वेळी छावणीत शेतकरी नसल्यामुळे सुदैवानेच मनुष्यहानी झाली नाही.

सोमवारी सकाळी पशुसंवर्धन, महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले. यात करचुंडी येथील सुभाष उद्धव िशदे या शेतकऱ्याची १४ जनावरे मृत्युमुखी पडली, तर भुजंग कलगुडे यांची ६ जनावरे दगावली.

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांत बल, गाय, म्हैस आणि वासरांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनीही छावणीला भेट देऊन सर्व छावणी चालकांना वीजप्रवाहापासून जनावरे दूर ठेवण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन केले. सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची ग्वाही यंत्रणेच्या वतीने देण्यात आली.