मुंबईच्या टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेत पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा शनिवारी कोंढवली (ता. वाई) येथील धोम जलाशयात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. सोमजीत शहा (वय २६ रा. कोलकाता), अवनीश श्रीवास्तव (वय २७ रा. गाझीयाबाद, दिल्ली) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत.

याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथील टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटरमध्ये पीएचडी करीत असलेले चार विद्यार्थी दुचाकीवरून आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धोम जलाशयाच्या परिसरात आले. कोंढवली येथे तंबू ठोकून जलाशयात पोहण्यासाठी गेले. दुपारी चारच्या सुमारास सोमजीत शहा (२६)व अवनीश श्रीवास्तव(२७) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले. ते जलाशयातील गाळात रुतल्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, ग्रामस्थांचा अंदाज आहे. तर त्यांच्यासोबत असलेले समीर गुप्ता व श्रीकांत तिरमाली यांना पोहता येत नसल्याने ते काठावर बसून होते. सोमजीत व अवनीश बुडायला लागल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना मदतीसाठी बोलावले. दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबतची माहिती पोलीसांना कळवली. त्यानंतर ग्रामस्थ व पोलीसांनी पडावाच्या सहाय्याने सोमजीत आणि अवनीशचा शोध घेण्यास सुरूवात केली. रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले आहे.

घटनास्थळी तहसीलदार अतुल महेञे,पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक पी. एस. कदम, पोलीस हवालदार एस. एस. जाधव, एस. बी. कुडवे, बी. आर. शिंदे, एम. जी. सय्यद, वायदंडे आदींनी घटनास्थळी धाव घेवून शोधकार्य हाती घेतले. बाजार समितीचे संचालक दत्ता भणगे, माजी सरपंच राजेंद्र चोरट, पोलीस पाटील संदीप चोरट व सुमारे ५०-६० ग्रामस्थ शोधकार्यात सहभागी झाले होते.