News Flash

सभापती निवडीत दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व

पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी व काँग्रेसने वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेसला सहा ठिकाणी, काँग्रेसला चार, शिवसेनेला दोन तर भाजपला एका ठिकाणी सत्ता

| September 15, 2014 01:50 am

पंचायत समिती सभापती व उपसभापतीच्या निवडीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी व काँग्रेसने वर्चस्व राखले. राष्ट्रवादी काँग्रेसला सहा ठिकाणी, काँग्रेसला चार, शिवसेनेला दोन तर भाजपला एका ठिकाणी सत्ता हस्तगत करता आली. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे आमदार बबनराव पाचपुते यांना या निवडीत जोरदार धक्का बसला. पाथर्डीतही माजी आमदार राजीव राजळे यांच्या गटाच्या ताब्यातून सत्ता निसटली. बहुतेक ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या.
नगर पंचायत समितीत सभापतिपदी संदेश कार्ले तर उपसभापतिपदी भाजपचे शरद झोडगे यांची बिनविरोध निवड झाली. झोडगे यांची फेरनिवड झाली. पाथर्डीत राजळे गटाला मावळत्या सभापती उषा अकोलकर यांनी ऐनवेळी सोडचिठ्ठी देत चंद्रशेखर घुले गटात प्रवेश करत पुन्हा पद मिळवले. उपसभापतिपदी बेबीताई केळगंद्रे यांची निवड झाली. राजळे गटाचे संभाजी पालवे व मनसेचे देविदास खेडकर यांनी अर्ज दाखल केले होते, मात्र त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. अकोलकर यांच्या बंडखोरीने संतप्त झालेले मावळते उपसभापती पालवे यांनी अकोलकर यांचा अर्जच सभागृहात फाडला. राजळे गटाच्या सदस्य कलावती गवळी यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलाने पोलिसांकडे केली.
श्रीगोंद्यात पाचपुते यांना जोरदार धक्का बसला. त्यांचे तीन सदस्य फुटले. तेथे दोन्ही काँग्रेस व भाजपची आघाडी झाली. भाजपच्या सदस्यांनीही पाचपुते यांना साथ दिली नाही. सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अर्चना पानसरे व उपसभापतिपदी संध्या जगताप यांची बिनविरोध निवड झाली. जामखेडला भाजपचे डॉ. भगवान मुरुमकर यांची फेरनिवड झाली तर उपसभापतिपदी यमुनाबाई घनश्याम मोरे यांची बिनविरोध निवड झाली. तेथे भाजपचे तीन सदस्य नाराजीतून अनुपस्थित राहिले. कर्जतमध्ये काँग्रेसच्या संगीता उदमले यांची सभापतिपदी तर भाजपचे बापू नेटके यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पक्षाचा व्हीप स्वीकारला नाही. राष्ट्रवादीचे सदस्य फुटल्याची चर्चा होती.
पारनेरला सेनेचे गणेश शेळके यांची सभापती व उपसभापतिपदी राणी नीलेश लंके यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या उपसभापती अरुणा बेलकर यांनी नाराजी व्यक्त करत ते अनुपस्थित राहिले. कोपरगावला कोल्हे गटाचे सुनिल देवकर यांची सभापतिपदी तर उपसभापती म्हणून वैशाली विजय साळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संगमनेरला काँग्रेसचे रावसाहेब नवले यांची सभापतिपदी तर उपसभापतिपदी शालिनी ढोले यांची बिनविरोध वर्णी लागली.
श्रीरामपूरला मुरकुटे गटाने वर्चस्व राखले. तेथे राष्ट्रवादीच्या वंदना राऊत यांची सभापतिपदी तर सुरेखा क्षीरसागर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. राहुरीत काँग्रेसच्या मंगला ज्ञानदेव निमसे यांची सभापती म्हणून तर उपसभापतिपदी मंदा वसंत डुक्रे यांची बिनविरोध निवड झाली. अकोल्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 1:50 am

Web Title: two congress ahead in speaker selection
टॅग : Congress,Ncp
Next Stories
1 उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत- नारायण राणे
2 ‘मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाही’
3 चंद्रपुरातील कोळसा खाणीत आग
Just Now!
X