नांदगाव तालुक्यात विवाहितेच्या भोळसट स्वभावाचा गैरफायदा घेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात, तर सिन्नर तालुक्यात शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदगाव येथील घटनेत विवाहितेच्या भोळसटपणाचा संशयितांनी गैरफायदा घेतला. उषा मिसाळ व रत्ना हिरणवाळे यांनी विवाहितेच्या स्वभावाची माहिती नाना गंगाराम औशीकर यांना दिली. औशीकर याच्यासह भगवंत मोहन काटकर, सुखदेव रतन गायकवाड, भिका चिमण औशीकर, रवींद्र वाघ यांनी धमकावून विवाहितेवर बलात्कार केला. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तातडीने सात संशयितांना अटक केली. एक जण अद्याप हाती लागू शकलेला नाही. अटक केलेल्या पाच  संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली, तर दोन महिला संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बलात्काराची दुसरी घटना सिन्नर तालुक्यात देशवंडी गावात घडली. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी अकरा वर्षीय मुलगी नैसर्गिक विधीसाठी सुळे वाडी येथे जात असताना दुचाकीवरून आलेल्या एकाने तिला निर्जन परिसरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. हा परिसर सिन्नर औद्योगिक वसाहतीलगत असून संशयित एखाद्या कारखान्यात सुरक्षारक्षक असल्याचा तपास यंत्रणेचा अंदाज आहे. पीडित मुलीला काही छायाचित्रे दाखवून पोलिसांकडून संशयिताची ओळख पटविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.