मुंबई-गोवा महामार्गावर तुरळजवळ खासगी आराम गाडीने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण ठार, तर सहा जण जखमी झाले.  अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे- किशोर शंकर गांधी (वय ३२ वष्रे) व राज सुभाष रसाळ (वय १० वष्रे, दोघेही रा. रत्नागिरी) पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश रसाळ यांचे हे दोघेही जण जवळचे नातेवाईक आहेत.  कारमधील सर्व जण बुधवारी पहाटे येथून मुंबईला निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ-डिकेवाडीजवळ असलेल्या छोटय़ा वळणावर त्यांची कार आली असता समोरून येणाऱ्या खासगी आराम गाडीचा (एमएच ०४ एफके ३७९) या लक्झरी बसशी जोरदार टक्कर झाली. त्यामध्ये कारचालक किशोर गांधी जागीच ठार झाला, तर राज रसाळ या लहान मुलाचा उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना मृत्यू ओढवला. mh06 कारमधील अक्षया अरुण गंगावणे (वय १२ वष्रे, रा. दापोली), अनिता अनंत केतकर (वय ५८, रा. श्रीवर्धन) व जान्हवी अरुण केतकर (वय ८ वष्रे रा. प्रभादेवी, मुंबई) हे तिघे जण जखमी झाले असून त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी बसमधील विशाल शंकर चव्हाण (वय ३२ वष्रे), अरुण धामू पापडे (वय ३४ वष्रे) व गीता सुरेश पापडे (वय ५० वष्रे, तिघेही रा. दहिसर, मुंबई) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईला लवकर पोचण्याच्या उद्देशाने सर्व जण पहाटे येथून निघाले, पण रस्त्यावरील दाट धुक्यामुळे दोन्ही वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला असावा, असे मानले जाते. अपघाताचे वृत्त कळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थानची व ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. कारचालक किशोर गाडीमध्येच अडकून पडला होता. त्याला बाहेर काढले असता तो जागीच ठार झाला असल्याचे लक्षात आले. लहानग्या राजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी तातडीने कोल्हापूरला नेण्यात आले, पण उपचारांपूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. दोन्ही वाहनांची धडक एवढी जोरदार होती की, कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, तर आरामबस रस्त्याच्या बाजूच्या कठडय़ावरून पलटी होऊन मोकळ्या शेताडीमध्ये जाऊन पडली.