औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील सह्याद्रीनगर येथे एका ५० वर्षीय विवाहितेने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तर छावणीमधील ख्रिस्तीनगर येथे ४५ वर्षीय कामगाराने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उषाबाई सुरेश अंभोरे (रा. सह्याद्री नगर, सातारा परिसर) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे बंद केले होते. काही दिवसांपासून त्या तणावाखाली होत्या. शनिवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे सर्वांसोबत जेवल्या. त्यानंतर सर्व जण झोपले. रविवारी पहाटे चार वाजता घरातील सदस्य झोपेतून उठल्यावर उषाबाई खोलीत न दिसल्याने नातेवाईकांनी त्यांना हाक मारली. मात्र त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर बाथरुममध्ये पाहिले असता, उषाबाईंनी नायलॉन दोरीच्या मदतीने गळफास घेतल्याचे आढळले. यानंतर नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत उषाबाईंना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसऱ्या घटनेत छावणी भागातील ख्रिस्तीनगर भागात राहणारे सुधाकर सुदर्शन आठवले यांनी शनिवारी मध्यरात्री दोरीच्या मदतीने गळफास घेतला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी सुधाकर यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.