गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. ही चकमक आज (सोमवार) सकाळी साडेआठच्या सुमारास धानोरा तालुक्यातील निहालकाय जंगलात झाली. पोलिसांच्या अल्ट्रा आणि सी-६० पथकातील कमांडोजनी ही कामगिरी केल्याचे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

सुरक्षादलाकडून रविवारी रात्रीपासून नक्षलविरोधी मोहीम सुरु होती. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा पथकावर हल्ला केला. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. त्यानंतर शोध मोहिमेत दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आल्याचे पंडित यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात विधानसभा निवडणुका सुरु असलेल्या छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षादलावर हल्ला केला होता. पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु होण्याच्या काही मिनिटे आधी नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील नक्षलप्रभावीत क्षेत्रात आयईडी स्फोट घडवला होता. नागरिकांना त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.