शहरासह जिल्ह्य़ात करोनाचा फैलाव होणे सुरूच असून अत्यवस्थ असलेल्या दोन महिला रुग्णांचा मंगळवारी सकाळी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील कोविड कक्षात मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे, नव्याने आठ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५५ झाली आहे.

मंगळवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयात मृम्त्यू झालेल्या रुग्णांमध्ये धुळे शहरातील नगांवबारी परिसरातील २७ वर्षांची महिला तसेच शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील ५५ वर्षांच्या महिलेचा समावेश असल्याची माहिती प्रमुख अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे. याआधी जिल्ह्यात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री ४९ संशयितांचा तपासणी अहवाल सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाकडे आला. त्यात आठ जण सकारात्मक आहेत. मालेगांव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका पोलिसाचा त्यात समावेश आहे. शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील एक जण असून उर्वरित सहा रुग्ण हे भांडूप येथील आहेत. ते मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाण्याजवळ दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात जखमी झाले होते. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची करोना चाचणी सकारात्मक आली आहे.