राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उदय सामंत यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. विशेषत: महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर तब्बल ५३ वर्षांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्यासह अनेकांनी सामंत यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे स्वागत केले आहे.
तीनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व वीस मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते व तेव्हापासूनच राजकीय हालचालींना कमालीचा वेग प्राप्त झाला होता. अचानक घेतलेल्या या निर्णयामागे आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी काहींना तयारी करावी लागेल, असे पवार यांनी सूचित केले होते. त्या दृष्टीने व्यूहरचना सुरू असतानाच अचानक राजीनामे घेण्यात आल्याने सारेच जण चक्रावून गेले होते. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रफुल्ला पटेल यांनी मंगळवारी केवळ चारच मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे संकेत दिले, मात्र त्यांनी त्यांची नावे जाहीर न केल्याने, ‘वगळण्यात येणारे’ ते ‘मंत्री कोण? आणि नवे मंत्री कोण होणार?’ अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. अखेर आज सकाळी ११ वाजता राजभवनावर चार नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
रत्नागिरीचे आमदार उदय रवींद्र सामंत यांचा समावेश मंत्रिमंडळात झाला असून त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली आहे. याबाबतचे वृत्त रत्नागिरीत येऊन धडकताच आज सकाळपासूनच जयस्तंभ, मारुती मंदिर, लक्ष्मी चौक, शिवाजीनगर या शहराच्या प्रमुख भागांसह सामंत यांच्या पाली गावात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
तब्बल ५३ वर्षांनी रत्नागिरीला मंत्रिमंडळात स्थान
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर गेल्या ५३ वर्षांत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. यापूर्वी चिपळूणचे माजी आमदार कै. पी. के. तथा बाळासाहेब सावंत, हुसैनभाई दलवाई, दापोलीचे कै. बाबूराव बेलोसे, राजापूरचे कै. ल. रं. तथा भाईसाहेब हातणकर (सर्व काँग्रेस), संगमेश्वरचे रवींद्र माने, खेडचे रामदासभाई कदम (दोघेही शिवसेना-भाजप युती), तर आजच मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले भास्कर जाधव (राष्ट्रवादी) यांनी मंत्रिपदे भूषविली असून शिवसेना-भाजप युती सत्तेत असताना रत्नागिरीचे माजी आमदार कै. शिवाजीराव गोताड (भाजप) यांच्याकडे राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते. तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपदापासून कायम वंचित ठेवण्यात आले होते. मात्र आता उदय सामंत यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाल्याने गेली ५३ वर्षे या मतदारसंघावर झालेला अन्याय दूर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य – सामंत
उदय सामंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले, आमचे मार्गदर्शक व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेबांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी मी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडून, पवारसाहेबांच्या विश्वासाला पात्र ठरेन, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबरच जिल्ह्य़ात पक्षाच्या संघटना वाढीसाठी सर्व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेणार असल्याचे उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
उदय सामंत २००४ व २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे बाळ माने यांचा पराभव करून निवडून आले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रांशी त्यांचा निकटचा संबंध असून अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे (रत्नागिरी शाखा) अध्यक्ष तसेच अ. भा. मराठी नाटय़ परिषद, नियामक मंडळ, मुंबईचे सदस्य आहेत.