विधान परिषदेसाठीची पध्दत आगामी निवडणुकांमध्ये नाही

विधान परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी संख्याबळ अधिक, तिथे शिवसेनेने आपले उमेदवार दिले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी मित्र परिवार, नातेसंबंध, ऋणानुबंध जोपासत स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्यावा तसेच ज्या जागांवर सेनेचा उमेदवार नाही, तिथे कोणाला मदत करायची हे स्थानिकांनी ठरवावे अशी सूचना करण्यात आल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ कागदावर स्पष्ट दिसते. त्याआधारे सेनेने आपले उमेदवार जाहीर केले. विधान परिषद आणि अन्य निवडणुका यामध्ये फरक असतो. ही पध्दत आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अवलंबली जाणार नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना स्वबळावर लढण्यास ठाम असल्याचा पुनरूच्चार ठाकरे यांनी केला.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, रविवारी पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरीकडे स्वतंत्रपणे बैठक झाली. जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणी, बूथरचना, स्थानिक पातळीवरील स्थिती, रिक्त पदे आदींची माहिती घेऊन ठाकरे यांनी सेनेतील सर्व जण लढण्याच्या तयारीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. स्वबळावर निवडणूक लढण्याबद्दल शिवसैनिकांमध्ये द्विधा मनस्थिती नाही. परंतु, इतरांमध्ये यासंदर्भात असलेला संभ्रम दूर होण्याकरिता आणखी काळ जाऊ द्यावा लागेल, असे त्यांनी सूचित केले.

विधान परिषद निवडणुकीत सेना-भाजपने अधिकृतरित्या युती केलेली नाही. दोन्ही पक्षांकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार बहाल करत भाजपशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. पालघरसारख्या आदिवासी भागात हिंदुत्वाची पाळेमुळे रुजविण्यासाठी भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष केले. हिंदुत्वासाठी अविरत काम करणाऱ्या वनगा कुटुंबियांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला असून उमेदवारीविषयी विचार केला जाईल, असे ठाकरे यांनी नमूद केले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तिथे दुहीचे राजकारण सुरू असले तरी मराठी जनतेने आपले प्रश्न, भावना मांडण्यासाठी समितीच्या उमेदवारांना विधानसभेत पाठविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

मोदी विदर्भात समुद्रही आणतील

नाणार प्रकल्पाची अधिसूचना आम्ही रद्द केली असल्याने तो प्रकल्प कोकणात होणार नाही. हा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपुष्टात आला आहे. विदर्भ विकासाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी भाजपने हा प्रकल्प विदर्भात न्यावा, असे ठाकरे यांनी पुन्हा सूचित केले. तेल शुध्दीकरण प्रकल्पासाठी समुद्र किनाऱ्याची आवश्यकता नसते. सहा ते सात प्रकल्प समुद्र नसलेल्या भागात कार्यरत आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी त्याचा अभ्यास करून नाणार प्रकल्प विदर्भात आणावा, अशी मागणी केली आहे. ती योग्य देखील आहे. या प्रकल्पाला समुद्राची इतकीच गरज भासली तर मोदींना सांगावे ते त्वरित विदर्भात समुद्र आणतील. आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो, अशी कोपरखळी ठाकरे यांनी मारली.