राष्ट्रवादीने आधी डल्ला मारून झाला आहे आता कसला हल्लाबोल करता? असा प्रश्न विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. मराठवाडा या ठिकाणी काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगता शनिवारीच झाली. ज्यामध्ये शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले. तसेच या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे नसल्याचीही टीका त्यांनी केली. या सगळ्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. महाराष्ट्रातला शेतकरी साधाभोळा आहे म्हणूनच त्याचा गैरफायदा घेतला जातो आहे. माझ्या शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने सगळ्यात जास्त मेळावे घेतले आहेत अशीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

पैठण या ठिकाणी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवरही टीका केली. पैठणमधील शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. उस गाळप हंगामासारखीच आता निवडणुकांच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र आम्ही एकटेच लढणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भाजपासोबत युती केली. आम्हाला वाटले होते की ते देश सांभाळतील आणि आम्ही महाराष्ट्र सांभाळू. मात्र ते तर आमच्या घरातच शिराला लागले अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही खिल्ली उडवली.