मृत्यू बुडून की विषप्रयोगाने याची परिसरात चर्चा
सिंदेवाही व पळसगाव वनपरिक्षेत्रातील उमानदीच्या पात्रात वाघिणीचा मृतदेह तरंगतांना आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे. वाघिणीचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वीच झाला असल्याने सर्व अवयव सडलेले होते. पाण्यात बुडून किंवा विषप्रयोगाने शिकार केली असावी, अशीही चर्चा या परिसरात आहे. शवविच्छेदनानंतरही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. व्हिसेरा व अवयव तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
ब्रम्हपुरी वन विभागाअंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक २४२ व पळसगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक २३० मधून उमा नदी वाहते. वनपथक शुक्रवारी सकाळी गस्तीवर असताना त्यांना नदीत एका पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याची माहिती सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी यांना मिळताच ते व चंद्रपुरातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने, इको प्रोचे बंडू धोतरे, मुकेश भांदककर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रवीकांत खोब्रागडे, पंचायत समिती मूलचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हागवने घटनास्थळी पोहोचले. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे व डॉ.हागवने यांनी शवविच्छेदन केले.
वाघिणीचा मृत्यू पाच-सहा दिवसांपूर्वी झालेला असल्याने संपूर्ण अवयव गळलेले होते. पायाची नखे, मिशांचे केस व चामडी जैसे थे होती. वाघीण अंदाजे पाच-सहा वषार्ंची होती. शरीर सडलेले असल्याने तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही, असे डॉ. खोब्रागडे यांनी सांगितले.
उमा नदीचे पात्र काही ठिकाणी कोरडे, तर काही ठिकाणी पाणी आहे. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी वाघिणीची शिकार करून नंतर मृतदेह नदीत तर फेकला नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. कारण, वाघ आणि वाघिणीला पोहता येते. त्यामुळे वाघिणीचा मृत्यू नदीत बुडून होऊच शकत नाही, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. दुसरीकडे, कुणी विषप्रयोग तर केला नाही ना, अशीही चर्चा आहे. व्हिसेरा व शरीराचे अवयव तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. शिकारीचा प्रकार असेल तर या चाचणीत तसे स्पष्ट दिसून येईल, असेही डॉ. खोब्रागडे यांनी स्पष्ट केले.