हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत कोकणात मंगळवारी काही ठिकाणी वारा-वादळासह जोरदार पाऊस पडला, काही ठिकाणी गारपीटही झाली, तर इतरत्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहिले. त्यामुळे आंबा बागायतदार पुन्हा धास्तावले आहेत.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आभाळ भरून आले आणि त्यापाठोपाठ सोसाटय़ाच्या वादळी वाऱ्यासह सुमारे सव्वा तास गारपीटही झाली. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटल्या, तर काही घरांचे पत्रे उडून टेलिफोनच्या तारांवर पडल्याने संपर्क तुटला. संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला.
पावसाने निसरडय़ा झालेल्या रस्त्यांवर वाहने घसरून प्रवासी जखमी होण्याचे प्रकार घडले.
रत्नागिरी जिल्ह्यात सुदैवाने संध्याकाळपर्यंत कुठेही पाऊस पडला नाही, पण अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. काही दिवसांपूर्वीच बसलेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यातून सावरण्यापूर्वीच पुन्हा वातावरण बिघडल्यामुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, आंबोली, चौकुळ इत्यादी भागातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. चौकुळच्या परिसरात तर काही प्रमाणात गारपीटही झाली.
हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार एखादा दिवस वगळता येत्या शनिवापर्यंत असेच हवामान राहणार आहे.
पोलादपूरला गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा
मराठवाडय़ापाठोपाठ आता कोकणातील अनेक भागांना गारपिटीने झोडपून काढले आहे. रायगड जिल्ह्य़ातील पोलादपूर तालुक्याला गारपीट आणि वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आंबा आणि रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.  
संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने जवळपास सव्वा तास धुडगूस घातला. यात मोठी हानी झाली. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर विद्युतपुरवठाही खंडित झाला. गारपिटीमुळे शेती तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले.
 राष्ट्रीय महामार्गावर लोहारमाळजवळ एक तवेरा कार घसरून रस्त्यालगत पलटली. पोलादपूर पंचायत समितीच्या कार्यालयाच्या इमारतीवरही महाकाय निलगिरीचा वृक्ष कोसळला तर काही घरांचे मांडवांचे पत्रे उडून टेलिफोनच्या तारा तुटल्या. अचानक आलेल्या पावसाने सर्वाची तारांबळ उडाली.
मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे वाहतूक मंद गतीने सुरू असतानाच लोहारमाळजवळील शेलार ढाब्यावर एक तवेरा गाडी (एमएच ०३ बीएच ८१२८) निसरडय़ा रस्त्यावरून झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले. यामध्ये अशोक श्रीपाद िशदे (६०), कृष्णाबाई श्रीपाद िशदे (८०), साईराम मंगेश जाधव (७), इंदूबाई राजाराम जाधव (५२), राजाराम गणपत जाधव (७०) आणि प्रदीप िशदे (४२), सर्व रा.परसुले, ता. पोलादपूर, सध्या कुर्ला मुंबई) हे जखमी झाले.