शाळा सुरू होऊन महिना होत आला, तरीही उर्दू माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची अजूनही अनेक विषयांच्या पुस्तकांची प्रतीक्षा संपलेली नाही. वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाकडून उर्दू माध्यमाची पाठय़पुस्तके उपलब्ध केली जात नाहीत. चौथी, दुसरीच्या वर्गातील पुस्तके अजूनही प्राप्त न झाल्याने विद्यार्थ्यांना शिकवावे तरी काय, असा प्रश्न शिक्षकांमधून विचारला जात आहे.
जिल्हय़ात पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांमध्ये पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळपास सर्व विषयांची पाठय़पुस्तके प्राप्त झाली आहेत. परंतु उर्दू माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अजून पुस्तके मिळाली नाहीत. पहिली, दुसरी व चौथीच्या वर्गातील विविध विषयांची पुस्तके मिळालीच नसल्याने शिकवावे तरी काय, हा प्रश्न शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.
उर्दू माध्यमातील पहिली ते आठवीच्या वर्गासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे पाठय़पुस्तके उपलब्ध झाली होती. परंतु काही विषयांची पुस्तके शिक्षण विभागालाच प्राप्त झाली नाहीत. त्यामुळे पुस्तके वाटणार तरी कोठून, अशी अडचण शिक्षण विभागातील अधिकारी बोलून दाखवत आहेत. पुस्तके मिळत नसल्याने शिक्षक दररोज गटशिक्षण अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. मात्र, पुस्तके आली नाहीत, असे सांगून अधिकारी वेळ मारून नेतात.