ग्रामीण आरोग्यसेवेची स्थिती बिकट

राज्यातील ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सेवा देण्यास फारसे उत्सुक नसतानाच वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवरही रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये परिचारिकांची तब्बल २ हजार ८७५ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

‘इंडियन नर्सिग कौन्सिल’ने शहरामध्ये तीन रुग्णांमागे एक परिचारिका आणि ग्रामीण भागात चार रुग्णांसाठी एक असे प्रमाण निश्चित केले आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊ  शकलेली नाही. काही ठिकाणी तर एका परिचारिकेला एकावेळी २५ ते ३० रुग्णांची सेवा करावी लागते. प्रत्येक तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण महाराष्ट्र परिचर्या परिषदेनेही मान्य केले आहे. पण, प्रत्यक्षात रुग्णालयांमधील खाटा आणि जमिनीवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण काही ठिकाणी ४० रुग्ण आणि एक परिचारिका यापेक्षाही जास्त होते, असे एका संशोधनातून आढळून आले आहे.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व संवर्गातील परिचारिकांची एकूण २४ हजार ८१३ पदे मंजूर असून २१ हजार ९३८ पदे भरलेली आहेत, तर २ हजार ८७५ पदे रिक्त आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागांतर्गत एकूण ११ हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी ९ हजार ८४० पदे भरलेली आहेत, तर १ हजार ३४१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता परिचारिकांची संख्या दुप्पट करणे आवश्यक आहे, असे परिचारिकांच्या संघटनेचे म्हणणे आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने शुश्रूषा संवर्गातील रिक्त पदे भरली जात आहेत. तरीही कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण जाणवतच आहे. आरोग्य संचालनालयांतर्गत असलेल्या पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानातून तसेच बंधपत्रित परिचारिकांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देऊन हा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रुग्णांना फटका

उच्च शिक्षणासाठी तसेच प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिनियुक्ती तसेच अध्ययन रजा नियमानुसार देण्यात येतात. प्रचलित नियमांनुसार बदली करण्यात येते. चांगल्या सेवा देणाऱ्या परिचारिकांना पुरस्कृतही करण्यात येते. कालबद्ध पद्धतीने पदोन्नती देण्यात येते. सर्व भत्ते दिले जातात, निवासासाठी घरेही दिली जातात, असे सरकारचे म्हणणे आहे. पण, सर्वात बिकट स्थिती ग्रामीण भागात आहे. साथीचे आजार बळावतात, तेव्हा तर परिचारिकांसाठी युद्धप्रसंग असतो. अशा स्थितीत रिक्त पदांमुळे रुग्णांना फटका बसतो.