अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील तलावात मासेमारीसाठी लिलाव दिला जातो. या लिलावात ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले. याला तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप दिवकर यांना जबाबदार धरण्यात आले असून ही रक्कम त्यांनी न भरल्यास पगारातून वसूल करण्याचे आदेश गटविकास अधिकारी वीणा सुपेकर यांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.वेश्वीतील सामाजिक कार्यकर्ते आणि जनजागृती मंचाचे अध्यक्ष पुरषोत्तम गोखले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. वेश्वीमधील गोकुळेश्वर तलावातील मासे सोडणे व पकडणे यासाठी २००७-२००८ मध्ये लिलाव काढण्यात आला होता. हा लिलाव सुभाष बेंडखळे यांनी १ लाख ७० हजारांच्या बोलीवर घेतला होता. ग्रामपंचायतीने तसा करारनामा केला होता, मात्र या रकमेपैकी ७० हजारांची रक्कम बेंडखळे यांनी भरली नाही. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश माळी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. तेव्हा तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप दिवकर यांनी लिलाव चुकीच्या पद्धतीने केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय दिवकर यांनी लिलावधारकाकडून जामीन घेतली नसल्याचेही समोर आले. या विरोधात माळी यांनी जनजागृती ग्राहक मंचाच्या माध्यमातून गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.
अखेर तक्रारीच्या चौकशीअंती प्रदीप दिवकर यांना दोषी ठरवण्यात आले. बेंडखळे यांनी ही ४५ हजारांची रक्कम भरली नाही, तर तत्कालीन ग्रामसेवक प्रदीप दिवकर यांच्या पगारातून ही रक्कम जमा करण्याचा आदेश गट विकास अधीकारी वीणा सुपेकर यांनी दिले.