समाजातील चालिरीती आणि शासनाच्या नियमांवर प्रकाशझोत टाकणारा तसेच नाशिकच्या ११ कलाकारांची भूमिका असलेला माऊली निर्मित आणि दीपक कदम दिग्दर्शित ‘वाक्या’ या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन जानेवारीमध्ये होणार आहे.
या चित्रपटाच्या चित्रफितीचे प्रकाशन अलीकडेच नाशिक येथे झाले. समाजातील दुर्लक्षित अशा आर्थिक दुर्बल आणि अल्पसंख्याक असलेल्या पोतराज या भटक्या व विमुक्त जाती जमातीवर ‘वाक्या’ या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे. शिक्षण या महत्त्वपूर्ण घटकाबरोबरच शासनाच्या लोकोपयोगी योजनांपासून हा समाज आजवर कशा प्रकारे दुर्लक्षित राहिला आहे याचे दर्शन या चित्रपटातून करण्याचा प्रयत्न झाला आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. याशिवाय अभिजित कुलकर्णी, प्रियंका नागरे, दिनेश उघाडे, निशा काथवटे यांसह किशोरी शहाणे, प्रेमाकिरण या प्रसिद्ध अभिनेत्रींचा समावेश आहे. नाशिकच्या पन्शुल कमोद या बालकलाकाराची ‘सोन्या’ ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय नाशिकच्या पी. के. गायकवाड, सदाशिव जगताप, सुनंदा ठाकरे, सुनीता नहार, संभव नहार, कोमल नहार यांना या चित्रपटात आपला अभिनय दाखविण्याची संधी मिळाली असून, या चित्रपटाचे चित्रीकरण नगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये झाले आहे.