News Flash

शेतकऱ्यांनी ज्ञान, विज्ञान व व्यापार त्रिसूत्री अवलंबावी -डॉ. पाटील

तंत्रज्ञान असूनही केवळ वापराअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती बदललेली नाही. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकात न अडकता ज्ञान, विज्ञान, व्यापार या त्रिसूत्रांचा अवलंब करून शेतीतूनच विकास साधावा, असे आवाहन

| May 19, 2014 01:55 am

तंत्रज्ञान असूनही केवळ वापराअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती बदललेली नाही. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकात न अडकता ज्ञान, विज्ञान, व्यापार या त्रिसूत्रांचा अवलंब करून शेतीतूनच विकास साधावा, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी संचालक डॉ. एस. ए.पाटील यांनी केले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी खरीप मेळाव्यात उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, प्रमुख अतिथी म्हणून मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे, जिल्हा कृषी अधीक्षक साहेबराव दिवेकर, महाराष्ट्र कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, कृषी विद्यापीठांनी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले. पंरतु त्याचा वापर होत नसल्याने शेतीत पाहिजे तेवढा बदल झाला नाही. यामुळे शेतकरी अजूनही आहे त्याच अवस्थेत आहे. सुशिक्षित तरुणांनी शेतीकडे पाठ फिरविल्याने शेती अजूनही पारंपरिक पद्धतीने पिकवली जात आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.  खर्च कमी करण्यासाठी गट शेतीची कास धरण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनी स्वत: शेतीचा डॉक्टर व्हावे, मजूर टंचाईला पर्याय म्हणून उपलब्ध असणाऱ्या यंत्रांचा अधिक वापर करावा, कृषी विद्यापीठात येऊन येथील ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर आपल्या शेतीत करून विकास साधावा, असेही ते म्हणाले.
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि अवेळी येणारा पाऊस हा हवामानातील होणारा बदल हे कृषी विद्यापीठासमोर आव्हान आहे. हे आव्हान स्वीकारून हवामान बदलावर उत्तर शोधावे, असे बोराडे यांनी सांगितले. बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने शेतकरी मोठय़ा अपेक्षेने कृषी विद्यापीठांकडे पाहतो. त्यामुळे विद्यापीठांनी शेतकऱ्यांना लागेल तेवढे बियाणे पुरविण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.  विद्यापीठाला बियाणे उत्पादन करणे शक्य नसेल तर विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या मदतीने बियाणांचे उत्पादन केले पाहिजे, असा सल्ला बोराडे यांनी दिला. शेतीचा कारभार महिलांच्या हाती सोपवा. फूलशेतीला प्राधान्य द्या, जमिनी नापीक करणाऱ्या  रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय शेतीची कास धरा, असेही बोराडे म्हणाले.
अध्यक्ष समारोपात कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी पाणी संरक्षणाची गरज व्यक्त केली. यंदा उगवण क्षमता कमी असल्याने सोयाबीन बियाणे उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करून पुढच्या वर्षी विद्यापीठाकडून मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या कृषिभूषण पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यापीठाच्यावतीने प्रकाशित केलेल्या विविध शेती पुस्तिकांचेही प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अशोक ढवण व सूत्रसंचालन प्रा. डॉ. वीणा भालेराव यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:55 am

Web Title: vasantrao naik marathwada agri unversity 42 anniversary
Next Stories
1 राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरळीत
2 अपक्षांच्या खात्यात १ लाख ३७ हजार मते
3 पित्याच्या अपमानानंतर नववधूची वराला अद्दल!
Just Now!
X