|| प्रबोध देशपांडे

वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीबाबत उत्सुकता :- अकोला व वाशीम जिल्हय़ात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीमध्ये दोन्ही जिल्हय़ांत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची कसोटी लागणार असून, या प्रस्थापित पक्षांपुढे गड कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. लोकसभा आणि विधानसभेतील अपयश पुसून काढत बालेकिल्ला अभेद्य राखण्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. भाजपचा स्वबळावर सत्ता काबिज प्रयत्न आहे. राज्यात शिवसेनेचे सत्तेचे समीकरण जुळून आल्यास या निवडणुकीमध्ये महाआघाडीचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.

अकोला जिल्हा परिषद भारिप-बहुजन महासंघाचा गड समजला जातो. आता भारिप-बमसं वंचित आघाडीत विलीन झाला. जिल्हा परिषदेच्या गेल्या चार निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाला एकहाती यश मिळाले. गत निवडणुकीत भारिप-बमसंला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी राष्ट्रवादी, अपक्ष व शिवसेनेतील बंडखोरांच्या सहकार्यामुळे त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी विविध समाज घटकांची एकत्रित मोट बांधून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा प्रयोग केला. तो फारसा यशस्वी ठरला नाही. बाळापूरची एकमेव जागाही त्यांना गमवावी लागली. जागा निवडून आल्या नसल्या तरी, जिल्हय़ात वंचितचा प्रभाव दिसून आला. पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांत वंचितच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. आता जिल्हा परिषदेची निवडणूक वंचितसाठी अस्तित्वाची लढाई राहील.

भारिप-बमसंच्या गडाला सुरुंग लावून स्वबळावर भाजपचा झेंडा फडकवण्याचे लक्ष्य केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह जिल्हय़ातील भाजप आमदारांचे आहे. त्यादृष्टीने गत दोन-तीन वर्षांपासून ग्रामीण भागात भाजपची संघटन बांधणी करण्यात आली. महायुतीमध्ये बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा गड शिवसेनेने जिंकला. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास जिल्हा परिषद निवडणुकही ते एकत्रित लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी तरी आघाडी करूनच निवडणुकीला समोरे जातील. अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित व भाजपमध्येच तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज आहे.

राजकीय समीकरणात बदल

अकोला व वाशीम जिल्हय़ात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७ जानेवारीला मतदान होणार आहे. ८ जानेवारीला मतमोजणी होईल. अकोला जिल्हा परिषदेचे ५३ गट, पंचायत समित्यांचे १०६ गण, वाशीम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक होत आहे. या गट व गणांच्या रचना व आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.

वाशीममध्ये दोन्ही काँग्रेसच्या सत्तेला आव्हान

वाशीम जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या कार्यकाळात अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीकडे होते. शिवसेनेकडेही एक सभापती पद, तर भारिप-बमसं व अपक्षांनीही पाठिंबा दिला होता. वाशीम जि.प.तील सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान महाआघाडीपुढे राहील. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात भाजपने दोन, तर काँग्रेसने एक जागा कायम राखली. रिसोडचा गड कायम राखताना काँग्रेसचे अमित झनक यांची  दमछाक झाली. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करून तुल्यबळ लढत दिली.

पक्षीय बलाबल

अकोला जिल्हा परिषद

  • भारिप-बमसं     –        २४
  • भाजप               –        ११
  • शिवसेना           –        ०८
  • काँग्रेस             –        ०४
  • राष्ट्रवादी        –        ०२
  • अपक्ष           –          ०३

वाशीम जिल्हा परिषद

  • काँग्रेस                – १७
  • राष्ट्रवादी     –        ०७
  • शिवसेना      –        ०८
  • भाजप      –            ०६
  • मनसे       –           ०४
  • भारिप-बमसं   –    ०३
  • अपक्ष  –               ०६