विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

वसई-विरार महानगरपालिका आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या वतीने वसई किल्लय़ाचा २८१ वा विजयोत्सव शनिवार, १८ मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दोन दिवसांच्या महोत्सवात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यातून १९ मे रोजी जिंकला होता. तो दिवस वसई विजय दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा २८१वा विजय दिन आहे. दरवर्षी वसई-विरार महानगरपालिका आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या वतीने हा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही शनिवार, १८ मे आणि रविवार, १९ मे रोजी वसई विजय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षिजित ठाकूर, महापौर रुपेश जाधव उपस्थित राहणार आहेत. वसई किल्ला सफर, मशाल यात्रा, ढोल ताशा पथकाचे सादरीकरण, किल्ले बांधणी प्रदर्शन, मिसळ व पारंपरिक खाद्यपदार्थ महोत्सव, बालजत्रा आयोजित करण्यात आली आहे.

संध्याकाळी मराठी आणि हिंदी गीतांची मैफल असलेला जीवनगाणी हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रविवार, १९ मे रोजी बालजत्रा, खाद्यमहोत्सव तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वसईच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.