मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक व माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंडळाच्या सर्व उमेदवारांनी सुमारे दहा हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. त्यांनी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा धुव्वा उडविला. मुरकुटे समर्थकांना अवघी १ हजार ६०० ते १ हजार ९०० मते मिळाली.
मुळा कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले होते. आज नवीन तहसील कचेरीत शांततेत मतमोजणी झाली. या वेळी माजी खासदार गडाख हे मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र मुरकुटे व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. विजयानंतर गडाख समर्थकांनी एकच जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुळा कारखान्याची निवडणूक होत असल्याने तसेच मुरकुटे यांनी निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुरकुटे यांनी अतिशय असभ्य भाषेत गडाख यांच्यावर टीका केली. पण मतदारांना ती भावली नाही. जिल्ह्यात सर्वात प्रथम एफआरपीप्रमाणे भाव देणारा मुळा कारखाना असल्याने मतदारांनी गडाख यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. मुरकुटे यांना मुळाच्या कार्यक्षेत्रात समर्थकांनी थारा दिला नाही.
निवडणुकीत गडाख यांच्या सहकार मंडळाचे विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. कारभारी डफळ, दशरथ दरंदले, मोहन येळवंडे, यशवंतराव गडाख, बाबुराव चौधरी, एकनाथ जगताप, बाबासाहेब जगताप, भाऊसाहेब मोटे, एकनाथ रौंदळ, संजय जंगले, नानासाहेब तुवर, बाळासाहेब भनगे, नारायण लोखंडे, बाळासाहेब पाटील, दादासाहेब शेळके, कडूबाळ गायकवाड, अर्चना दरंदले, उषाबाई दरंदले, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब परदेशी.
ब वर्ग सेवा संस्था मतदारसंघातून जबाजी फाटके यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणुकीत संस्थापक गडाख यांना १० हजार २३७ एवढी सर्वाधिक मते मिळाली. तसेच त्यांच्या सहकार मंडळाच्या सर्व उमेदवारांना सरासरी १० हजार मते मिळाली. त्यांचे सर्व उमेवार निवडून आल्याने एकहाती सत्ता आली. सोनई परिसराने विधानसभेनंतर आमदार मुरकुटे यांना दणका दिला.
स्वच्छ कारभारावर शिक्कामोर्तब
निकालानंतर यशवंतराव गडाख यांनी कारखान्याच्या उत्तम कारभारावर सभासदांनी शिक्कामोर्तब केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रचाराच्या काळात विरोधकांनी केलेली हीन टीकाही सभासदांना रुचली नाही, हेच या निकालातून स्पष्ट झाले, असे ते म्हणाले.