सोलापूर : मागील आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना त्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सामावून घेतले गेले नसल्याच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मोहिते-पाटील यांच्याबरोबर आमचे अगोदरच ठरले आहे, असे म्हटले होते. या विधानाचा आधार घेत आपणा दोघांमध्ये काय ठरले, या प्रश्नावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्याला यातील काहीच माहिती नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रिपदासह अधिकृत भाजप प्रवेशाच्या मुद्यावर देखील त्यांनी मौन बाळगले.

मोहिते-पाटील हे माढा येथे माजी आमदार अ‍ॅड. धनाजी साठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधला. मात्र राज्य मंत्रिमंडळातील समावेशासह अन्य राजकीय जबाबदाऱ्यांविषयी छेडले असता मोहिते-पाटील यांनी कोणतेही भाष्य केले नाही. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नव्याने भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे-पाटील तसेच शिवसेनेत प्रवेश केलेले बीड जिल्ह्य़ातील नेते जयदत्त क्षीरसागर यांची मंत्रिपदी वर्णी लागली. मोहिते-पाटील पिता-पुत्रापैकी एकाचाही समावेश झाला नाही. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे आणि मोहिते-पाटील यांचे अगोदरच ठरले आहे, असे सूचक विधान केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा आधार घेत माढय़ात प्रसार माध्यमांनी छेडले असता मोहिते-पाटील यांनी या प्रश्नाला बगल दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विधानाशी संबंधित आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदार संघाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना शानदार विजय मिळवून दिला होता. राष्ट्रवादीला विशेषत: शरद पवार यांना मोठी नामुष्की पत्करावी लागली होती. माढा लोकसभेची जागा जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखी वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपची शक्ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात विखे-पाटील यांच्याबरोबर मोहिते-पाटील यांचाही समावेश होईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. ती फोल ठरली. त्यावर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, आमचे मोहिते-पाटील यांच्याबरोबर अगोदरच ठरले आहे.

मोहिते-पाटील पिता-पुत्रांचा योग्यवेळी तथोचित सन्मान केला जाईल, असे सूचक विधान केले होते. या पाश्र्वभूमीवर माढय़ाच्या भेटीवर आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांचे याबाबत लक्ष वेधले असता त्यांनी मंत्रिपदाबरोबरच अधिकृत भाजप प्रवेशाच्या मुद्दय़ावरही मौन पाळले. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहात काय, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी कटाक्षाने टाळले.