वायफळ खर्च व नियोजन शून्य कारभारामुळे राज्य सरकारवर बँकांकडे भीक मागण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे ३३९ कोटी बँकात जमा केल्याचे सांगत असले आणि वाहिण्यांवर कर्ज माफीच्या खोटय़ा जाहिराती दाखवित असले तरी प्रत्यक्षात राज्य सरकारवर ‘ओव्हरड्राफ्ट’ काढण्याची वेळ आली आहे. दसऱ्याला कर्जमाफीची घोषणा करून दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे सांगितले जात होते. मात्र, परिस्थिती इतकी वाईट आहे की होळीपर्यंतही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी आणि दिवाळखोरीवर चौफेर टीका केली. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. आजपर्यंत सरकारकडून बँकेला कर्जमाफीचा एक पैसाही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या दिवशी पैसे मिळाले नाही. त्याचाच परिणाम दिवाळीच्या दिवशी विदर्भात ५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीनंतरही पैसे जमा न झाल्यामुळे विदर्भात ५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यातील परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे. मुख्यमंत्री फडणवीस वाहिण्यांवर शब्दरूपी दिवाळी साजरी करीत आहेत. मात्र, दसऱ्याला जाहीर झालेल्या कर्जमाफीचे पैसे दिवाळीला तर जमाच झाले नाही आणि होळीला सुध्दा जमा होण्याची स्थिती नाही, अशीच एकूण परिस्थिती आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनाची अक्षरश: होळी केल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. आज राज्यभरात कर्जमाफीचे फलक लावले जात असले तरी भयावह स्थिती बघता या फलकांना संतप्त शेतकरी चपला जोडय़ांचा हार घालून निषेध करणार आहेत, असेही ते म्हणाले. नोटबंदी व जीएसटीमुळे राज्यात सर्वत्र असंतोषाचा भडका उडण्याची स्थिती आहे. राज्यावरील कर्जाचा वाढता डोंगर बघता आगामी हिवाळी अधिवेशनात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी २ टक्क्यांवर काम करण्यास एजन्सी तयार असतांना केंद्र सरकाच्या एजन्सीला १० टक्के दराने काम दिल्या जात आहे. केवळ हेच नाही तर रस्ते विकास प्रकल्पातही पुण्याच्या कन्सलटन्ट एजन्सीला एक हजार कोटीचे काम अशाच पध्दतीने दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

६ नोव्हेंबरला जनआक्रोश रॅली

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षांनिमित्त राज्यात सहा ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पूर्व विदर्भासाठी ६ नोव्हेंबरला चंद्रपूर येथे चांदा क्लब ग्राऊंडवर या जनआक्रोश रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला अ.भा. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह देश व राज्यपातळीवरील बहुसंख्य नेते उपस्थित राहणार आहेत. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा व गडचिरोली या पूर्व विदर्भातील सहा जिल्हय़ातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

‘तडीपारीची कारवाई मागे घ्यावी’

अवैध दारू प्रकरणी विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी अवैध दारूविक्रीच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन करणारे वहाणगावचे उपसरपंच प्रशांत कोल्हे यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई योग्य नाही. ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी अशीही मागणी वडेट्टीवार यांनी केली.