राज्य सरकारमधील पाकीटमारी, टक्केवारी व खिसेकापूगिरी यामधून जनतेला काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिवसेनेने पंतप्रधानांना भेटून टॅब दाखवण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मागितली असती तर त्यांना शाबासकी मिळाली असती, अशी टीका पत्रकारांशी बोलताना केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध समित्यांच्या बैठकीसाठी विखे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या स्थापनेला महिनाअखेरीला वर्ष पूर्ण होत आहे. त्यावर मत व्यक्त करताना विखे यांनी वरील प्रश्न उपस्थित केला. भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झालेली शिवसेनाच भाजपला पाकीटमार म्हणून हिणवते, याचे आश्चर्य वाटते असे सांगून विखे म्हणाले, सरकारचा सगळा कारभारच टक्केवारी व खिसेकापूगिरीचा आहे. तेच लोक सत्तेत सहभागी आहेत, अशा परिस्थितीत लोकांना काय मिळणार आहे?
मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर ‘क्राइम कॅपिटल’ झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रिपद सोडावे, दुसऱ्या एखाद्या सक्षम व्यक्तीकडे ते द्यावे. गृहमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीने राज्यातील जनतेची निराशा केली आहे, अशी टीका विखे यांनी केली. इंद्राणी मुखर्जी तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, हा सुरक्षाव्यवस्थेतील निष्काळजीपणा आहे. तरीही त्याची दखल घेतली गेली नाही, हा प्रकार संशयास्पद आहे. आरोपी पकडले गेले असतानाही आम्ही तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी करतो आहोत, कारण हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद वाटते. यामध्ये उच्चपदस्थही गोवले गेले आहेत.
ठाणे, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली महापालिका राष्ट्रवादीसोबत लढवायच्या की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय होणे आवश्यक आहे, असेही विखे म्हणाले.