मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय, मागासवर्गीय आयोगाची मेहनत आणि मराठा समाजाची एकजूट यामुळेच मराठी तरुणांना आता विकासाचा एक मार्ग खुला झाला आहे. मराठा विद्यार्थी आणि युवकांना अनेक संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. गरीब शेतकऱ्याचा मुलगा चांगला शिकेल, चांगली नोकरी मिळवेल हे काम भाजप – शिवेसना युती सरकारने केले ते कोणीच विसरणार नाही, मराठा समाजाच्या एकजुटीचा, दृढ निश्चयाचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रीया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने वकीलांची भक्कम फळी उभी केली आहे. तसेच कायदेशीरदृष्ट्या मराठा आरक्षण कसं योग्य आहे, हे उच्च न्यायालयासमोर मांडले आहे. त्यामुळे घटनात्मकदृष्ट्या हे आरक्षण वैध आहे, असाच निर्णय येईल, असा विश्वासही तावडे यांनी निर्णयापूर्वी व्यक्त केला होता.

यापूर्वीच्या सरकारने निवडणुकीकडे पाहता मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. परंतु मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती त्यांनी दिली नव्हती. परंतु गेल्या साडेतीन वर्षांमध्ये आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक माहिती, पुरावे आम्ही सादर केले. तसेच ते आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. यामध्ये केवळ सरकारचाच वाटा नाही, तर मागासवर्ग आयोगाने, तसेच काही सामाजिक संस्थांनीही हे आरक्षण टिकावे यासाठी दिवसरात्र मेहनत घेऊन माहिती गोळा केली, असल्याचेही तावडे म्हणाले होते.