• शासकीय योजनांपासून कोसो दूर
  • स्थलांतरित कामगारांचे आरोग्य, शिक्षणाचे प्रश्न गंभीर

दुसऱ्यांचे घर उभारण्यासाठी मजबूत वीट निर्माण करण्यात आपले आयुष्य खर्ची घालणारे राज्यातील वीटभट्टी कामगार समस्यांच्या विळख्यात राबत आहेत. आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या वीटभट्टी कामगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या असंख्य योजना त्यांच्यापासून कोसो दूरच आहेत. स्थलांतरित वीटभट्टी कामगारांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा, व्यसनाधिनता आदी गंभीर प्रश्न असून, त्यातच त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे.

वीटभट्टय़ांसाठी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत पोषक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हय़ांमध्ये वीटभट्टी उद्योग मोठय़ा प्रमाणात उभारण्यात आले. या उद्योगांवर काम करण्यासाठी सहजा-सहजी कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बहुतांश वीटभट्टय़ांवर स्थलांतरित कामगार राबत आहेत. या वीटभट्टी कामगारांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. वीटभट्टीवर काम करण्यासाठी संपूर्ण कुटुंब स्थानांतरित होत असल्याने संपूर्ण कुटुंबाचीच फरपट होऊन त्यांना समस्यांमध्ये होरपळावे लागते. विदर्भात वीटभट्टी कामगारांचे प्रश्न अधिकच गंभीर स्वरूपाचे आहेत. विदर्भात सर्वाधिक औष्णिक विद्युत प्रकल्प असल्याने त्यातून निघणारी राख वीटभट्टी उद्योगांना मोफतमध्ये उपलब्ध होते. त्यामुळे वीटभट्टी हा नफ्याचा धंदा म्हणून हा करण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, वीटभट्टी कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांचे एक प्रकारे शोषणच होत आहे.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

वीटभट्टी कामगारांना कामावर आणल्यानंतर त्यांना ठेकेदारी पद्धतीने काम दिले जाते. हजार विटांमागे ३०० ते ५०० रुपये दिले जातात. एक हजार विटा काढण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. वीटभट्टी कामगार बहुतांश दुसऱ्या जिल्ह्य़ातून, काही मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी भागातूनही येतात. ८ महिने ते झोपडीमध्ये राहतात. विटांचे कारखाने हे गावाजवळ कमी आणि जंगल परिसरामध्येच अधिक आहेत. जंगलातील लाकडाचा इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. घरदार सोडून परराज्यात किंवा जिल्ह्य़ात कामाला आलेल्या कामगारांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाहीत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसते. त्यांना दूषित पाणी प्यावे लागते. त्यामुळे त्यांना साथीचे आजार होतात. वीटभट्टीवरच आजारामुळे बळी जाणाऱ्या कामगारांचीही मोठी संख्या आहे. मात्र, अडचणीत येऊ नये या उद्देशाने बाहेर वाच्यता न करता परस्पर विल्हेवाट लावण्यात येते. त्यामुळे वीटभट्टीवर मृत्यू पावलेल्या कामगारांची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही.

अकोला  जिल्हय़ातील एका वीटभट्टीची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले. त्या ठिकाणी राबत असलेल्या एका वीटभट्टी कामगार कुटुंबातील महिलेचे सलग तिसऱ्यांदा त्याच वीटभट्टीवर बाळंतपण झाले. त्या महिलेला कुठलीही आरोग्य सुविधा मिळाली नाही. अकोला शहरापासून अवघ्या २५ कि.मी.अंतरावरील हे चित्र आरोग्य विभागाचे लक्तरे वेशीवर टांगणारे आहे. ऑक्टोबर ते मे दरम्यान कामगार आपल्या कुटुंबियांसह वीटभट्टीवर राबतात. जुन ते सप्टेंबर महिन्यांत आपल्या मूळ गावी राहून शेतमजुरी करीत असतात. या वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. ते कागदोपत्री आपल्या मूळ गावी शाळेत असले तरी प्रत्यक्षात शिक्षणापासून दुरावलेले असतात. वीटभट्टीवर राहून ते मुले बालमजुरीकडेही वळतात. त्यामुळे अकोला जिल्हय़ातील बाळापूर येथे वीटभट्टी शाळा सुरू करण्यात आली. तसाच प्रयोग शासनामार्फत संपूर्ण राज्यात होणे गरजेचे आहे. दिवसाचे १२ ते १५ तास राबणारे वीटभट्टी कामगार व्यसनाच्याही आहारी गेले आहेत. त्यांची व्यासनाधिनतेतून सुटका करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.