प्रशासन टाळेबंदीच्या उपायात गुंतलेले पाहून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपींना तब्बल ३५ लाख रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. वर्धा नदीच्या पात्रात पोकलॅन मशिनद्वारे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना मिळाल्यावर त्यांनी पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांह रात्री छापा टाकला. त्यात पोकलॅन मशीन, ट्रेलर, ट्रक तसेच ११० ब्रास रेती जप्त करण्यात आली. हे सगळे सामुग्री सोडून वाहनचालक पथकाला पाहून पळून गेले होते.

हिंगणघाटच्या चालकांना बोलावून हे यंत्र हिंगणघाटच्या तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. रात्री एक वाजेपासून सकाळपर्यंत ही कार्यवाही चालली. पोकलॅन मशीन अभिनव कापसे (वर्धा) तर ट्रक बंडू उमाटे (वरूड) यांच्या मालकीचा आहे. कार्यवाहीची माहिती होताच रेतीचे चार मोठे डंपर घटनास्थळावरून गायब झाले होते. रेतीची किंमत ४ लाख १८ हजार रूपये आहे. स्वामीत्वधनासह प्रती ब्रास २२ हजार ९०० रूपये या प्रमाणे एकुण २५ लाख १९ हजार रूपयाचा दंड ठोठावण्यात आला.

पोकलॅन मशिनसाठी साडेसात लाख रूपये तर ट्रकसाठी दोन लाख रूपये दंड आकारण्यात आला आहे. या व्यतीरिक्त फौजदारी कार्यवाही करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सद्यस्थितीत प्रशासन प्रतिबंधात्मक कार्यवाहीत गुंतलेले असल्याने व रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने रेती तस्कर रात्रीच्या वेळी हात साफ  करीत असल्याच्या तक्रारी होत आहे.

हिंगणघाटच्या या मोठ्या कारवाईत उपविभागीय अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, मन्नूलाल भलावी, विलास राउत, स्वप्नील देशमुख, प्रेमसिंग, दिपक अंधारे, अमिश रामटेके, शिपाई धनराज झाडे, कोतवाल दिनेश कोहपरे, वाहनचालक नय्युम शेख, सुनील पाऊलझाडे, गजानन काळे तसेच वनविभागाचे बनसोड व शेख यांचा सहभाग होता.