वर्धा जिल्हयातील शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांनी रेफर केल्याशिवाय कोणत्याही कोविड पॉझिटिव रूग्णांस कोविड रूग्णालयात दाखल करण्यात येवू नये असा, निर्णय जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

सेवाग्राम हॉस्पीटल व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय, सावंगी (मेघे) येथे सध्या गंभीर रूग्णांसाठी देखील बेड उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गंभीर रुग्णास बेड अभावी वेळीच औषधोपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बेडचे काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांना योग्य त्या रुग्णालयात बेड व उपचार मिळण्यासाठी प्रत्येक कोविड पॉझिटिव रूग्णास रेफर करण्यापूर्वी शासनाच्या निर्देशानुसार तयार केलेल्या ‘ रेफरल प्रोटोकॉल’ चे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यापुढे जिल्हा रूग्णालय, वर्धा, उपजिल्हा रूग्णालय, आर्वी / हिंगणघाट तसेच जिल्हयातील ग्रामीण रूग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांशी संबधित सर्व माहिती रेफरल फॉर्म मध्ये भरून सदर रूग्णाबाबत नियमानुसार निर्णय घेवून रूग्णास रेफर करावे. रूग्णास रेफर करण्यापूर्वी संबधित रूग्णालयात बेड उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच रूग्णांस रेफर करावे. बेड उपलब्ध असल्याची खात्री न करता कोणत्याही परिस्थितीत रूग्णाला संबधित रूग्णालयात अथवा कोविड केअर सेंटरला रेफर करण्यात येऊ नये. रुग्णास मनस्ताप किंवा त्याची गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित रुग्णालयांनी घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

या कार्यपध्दतीनूसारच रूग्णाच्या उपचार पध्दतीबाबत निर्णय घ्यावा. संबधित रुग्णालयांनी देखील योग्य पद्धतीने रेफर केलेल्या रूग्णांनाच यापुढे रूग्णालयात प्रवेश देण्याची कार्यवाही करावी. सदर प्रक्रियेचे सर्व संबधितांनी काटेकोरपणे पालन न केल्यास व निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबधितांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.