सावंतवाडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कागदी घोडे नाचविणारी यंत्रणा पाणीटंचाईचे भयाण चित्र रंगवीत नसल्याने अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. नळयोजना, विंधन विहिरी व विहिरींना पाणी मिळण्याचे कालचक्र बिघडून गेले आहे. नळपाणी योजना दर वर्षी दुरुस्ती करून पाण्याच्या नावावर पैसे जिरविले जात आहे. बांदा, तेरेखोल नदीपात्र आटले आहे, त्यामुळे यावर अवलंबून असणाऱ्या निगुडे, बांदा, इन्सुली, वाफोली, चराठे नळयोजनाना पाणी मिळणे दुरापास्त होत असल्याने तेरेखोल नदीपात्रात बिलवडे, सनमटेंब, माडखोल धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
दर वर्षी तेरेखोल नदीपात्रात धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होते, पण तेरेखोलसारख्या मोठय़ा नदीचे पाणी अडविण्याचा प्रयोग होत नाही. नळपाणी योजनेचे बंधारे कुचकामी ठरले आहेत. तेरेखोल नदीपात्रावरील नळपाणी योजना चिंतेत आहेत. पण दर वर्षी मागणी करून धरणाचे पाणी सोडण्याची याचना केली जाते, पण दूरदृष्टी ठेवली जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
विहिरींचे तळ दिसत आहेत. पाण्याची चणचण भासत असल्याने ग्रामीण भागात वणवण सुरू आहे. मुंबईकर चाकरमानी आपापल्या गावी आले आहेत. पाणीटंचाईमुळे काही गावांत चाकरमानीच पाण्यासाठी घागर-कळशी घेऊन विहिरीवर जात आहेत. नदीच्या पात्रातील पाणी काही भागात अस्वच्छ झाल्याने नळपाणी पुरवठाधारक काळजी घेत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पाणीटंचाई जाणवत आहे, हे प्रमाण अंशत: असून भीषण नाही. सागरी किनारी भागातील काही विभागातील विहिरीत खारेपाणी मिळत आहे. गोडे पाणी गायब होऊन खारे पाणी घुसल्याने तेथे पाणी दूरवरून आणले जात आहे. उष्ण हवामानामुळे विहिरींचे तळ पाणी नसल्याने दिसत आहेत.