रत्नागिरी शहरातील सुधारित नळपाणी योजनेसाठी ६३ कोटी २९ लाख मंजूर करण्यासाठी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी प्रयत्न केले. रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर व स्मार्ट बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूतोवाच करताना जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ११० कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचा मानस भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केला. रत्नागिरी शहराला मंजूर झालेल्या योजनेसाठी शिवसेना, भाजप युतीच्या तिन्ही नगराध्यक्षांनी प्रयत्न केले होते. माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांच्या कालावधीत योजनेचा सीडीपी व डीपीआर मंजूर झाला. तसेच विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी निधीची तरतूद करून आणली. अनेकांनी घोषणा केल्या, मात्र त्याची पूर्तता कोणालाही करता आली नाही. मात्र हे भाजपा-शिवसेनेच्या सरकारने करून दाखवल्याचे माने यांनी सांगितले. या योजनेचे भूमिपूजन १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी योजनेच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. रत्नागिरी शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये ड्रेनेज सिस्टीमचा अडथळा जाणवतो. शहरात भुयारी गटारांसाठी ६० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मार्च २०१७ अखेपर्यंत निधी मंजूर करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. ही योजना राबवताना टेलिफोन, विद्युत यंत्रणा यांच्या वाहिन्या फायबर ऑप्टीकलद्वारे या भुयारी योजनेद्वारे सर्वत्र शहरात कार्यान्वित करण्याचा विचार असल्याचे माने यांनी सांगितले. रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आवश्यक तो निधी आणणार आहे. तसेच वायफाय यंत्रणा शहरात सुरू करण्याचे आमचे स्वप्न असल्याचे माने यांनी सांगितले.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहतूक करताना अडथळे निर्माण होतात. राष्ट्रीय व राज्य महामार्गाला शासनाकडून निधी दिला जातो. परंतु हे ग्रामीण मार्ग दुर्लक्षित असतात. त्यांच्यासाठी ११० कोटींचा ग्रामीण विकास आराखडा ग्रामविकास विभागामार्फत केला जाणार आहे. या संदर्भात ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्या बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २ कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे माने यांनी सांगितले.

नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले अशोक मयेकर यांना जिल्हा परिषदेत संधी दिली जाणार असल्याचे बाळ माने यांनी यावेळी सांगितले. त्यावर अशोक मयेकर यांनी स्वतंत्रपणे खुलासा करत त्यांचे हे वक्तव्य खोडून काढले. त्यामुळे अंतर्गत वादविवाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.