सिन्नर तालुक्यापाठोपाठ आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनाही मोफत पाणी टँकर देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. गुजरात हद्दीजवळील देवडोंगरी गावापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २१ मार्च रोजी सिन्नर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मोफत पाणी टँकर देण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मागील तीन आठवडय़ांपासून संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांनाही टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. त्र्यंबकेश्वरपासून ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवडोंगरी गावापासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हरसूल गावाच्या पुढे गुजरात हद्दीजवळील हे गाव आहे. देवडोंगरीसोबत खडकओहोळ, यादडपाडा, देवडोंगरा, मनीपाडा या गावांना दररोज टँकरने पाणी दिले जात आहे. या उपक्रमासाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, नगराध्यक्ष योगेश तुंगार, त्र्यंबक तालुका अध्यक्ष नवनाथ कोठुळे आदींचे सहकार्य लाभल्याचेही गोडसे यांनी नमूद केले.