हर्षद कशाळकर, अलिबाग

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीबरोबर आता जलवाहतुकीचा पर्यायही पर्यटकांना उपलब्ध आहे. मुंबई ते मांडवा रो- रो सेवा अद्याप सुरू झाली नसली तरी, आगरदांडा ते दिघी, बागमांडला ते बाणकोट दरम्यान रो -रो सेवा सुरू झाली आहे. या जलवाहतूक सेवेमुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च आणि वेळही वाचतो आहे. त्याचबरोबर निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधीही येथील पर्यटकांना मिळते आहे.

बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. या मार्गाचे कामही त्यांच्या कारकीर्दीत सुरू झाले होते. मात्र मोठय़ा खाडय़ांवरील पुलांची कामे रखडल्याने सागरी मार्ग प्रत्यक्षात उपयोगात येऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेऊन आगरदांडा ते दिघी, आणि बागमांडला ते बाणकोट दरम्यान रो -रो सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा पर्यटकांसाठी आज आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत.

यामुळे रो-रो जलवाहतूक सेवेमुळे पर्यटकांना त्यांच्या गाडय़ांसह बोटीतून प्रवास करण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च आणि प्रवासाचा वेळ याची मोठी बचत होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस या सेवेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुरुड येथून दिवेआगर जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. हेच अंतर आगरदांडा ते दिघी जलवाहतूकमाग्रे पाऊण ते एक तासात पार करता येते. श्रीवर्धन येथून रत्नागिरीतील दापोली, हर्णे येथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावा लागतो. मात्र हे अंतरही बागमांडला, बाणकोट जलवाहतुकीने तासाभरात पार करता येते. याशिवाय कोकणातील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे.

अलिबाग ते मांडवा आणि रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान सध्या जलप्रवासी वाहतूक केली जाते. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर ही जलवाहतूक नियमित सुरू असते. दरवर्षी मांडवा ते मुंबई दरम्यान जवळपास साडेबारा लाख प्रवासी प्रवास करतात. तर रेवस ते भाऊचा धक्का दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्याही काही हजारात आहे. या जलवाहतूक सेवेमुळे अलिबाग परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे.

या जलवाहतूक सेवांमुळे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळते आहे. त्याच बरोबर त्यांच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि इंधन खर्चतही बचत होते आहे. त्यामुळे जलवाहतुकीच्या सुविधा अधिक बळकट करणे गरजेचे आहे.

आता अलिबाग तालुक्यातील रेवस ते उरण तालुक्यातील करंजा दरम्यान अशी रो- रो सेवा सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील मांडवा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. यामुळे पर्यटकांना त्यांच्या गाडय़ांसह अलिबागहून मुंबईला जाता येईल, विशेष म्हणजे हे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार आहे.