News Flash

“पेट्रोल दरवाढीवर आंदोलनं करणारे भाजपा नेते आता कुठे लपले?”

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल

संग्रहीत

”सध्या पेट्रोलचा दर शंभर रुपयांचा पार गेला आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते आता लपलेत कुठे?” असा सवाल महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपावर टीका केली. आता या नेत्यांना शोधायला हवे असेही ते म्हणाले.

”महाविकास आघाडीने महाराष्ट्रात करोनास्थिती नीट हाताळली. मात्र दुसऱ्या राज्यांमध्ये नदीत मृतदेह तरंगत होते, वाळूतून मृतदेह उघडे पडत होते. ही भारतासाठी लाजिरवाणी बाब आहे. यामुळे जगात भारताची प्रतिमा मलिन झाली आहे. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असे थोरात यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकारमध्ये सर्वकाही ठीकठाक आहे. मात्र भाजपा या सरकारमध्ये फूट पाडण्याचे स्वप्न पाहत आहे, त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.” अशी उपरोधिक टीकाही त्यांनी भाजपावर केली.

”स्वतःची इमेज राखण्यासाठी मोदींनी लशी परदेशात पाठवल्या व भारतीयांना उघड्यावर टाकले व आता देश अडचणीत आहे अशी टीकाही थोरात यांनी केली. मोदी सरकारचे सात वर्षांचे सरकार अपयशी ठरले आहे अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपावर केली. केंद्र सरकार भारतामध्ये दोन कोटी रोजगार देणार होते प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करणार होते. शंभर दिवसांत महागाई कमी करणार होते मात्र यातील कोणतेही आश्वासन केंद्र सरकारने पाळले नसल्यामुळे गेल्या सात वर्षांत हे सरकार अपयशी ठरले असल्याची वस्तुस्थिती आहे.” असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालघर जिल्ह्याचा आढावा घेतला. जिल्ह्यात तलाठी भरती करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असे ते म्हणाले. जिल्ह्याची करोनास्थिती व आकडेवारी समाधानकारक नाही. ज्यावेळेस हा आकडा शून्यावर येईल तेव्हा समाधान होईल. सर्वकाही संपले अशी धारणा जनतेने मनात न ठेवता आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाला खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे ते यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांच्यासोबत खासदार राजेंद्र गावित,आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, सभापती काशीनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 10:54 pm

Web Title: where are the bjp leaders hiding now who protesting against petrol price hike balasheb thorat msr 87
Next Stories
1 Corona Lockdown: राज्यात नवे नियम जाहीर; नेमके निर्बंध काय?
2 Corona: राज्यातील रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट वाढून ९३.५५ टक्क्यांवर
3 Maharashtra Lockdown : राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम!; काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करणार
Just Now!
X