मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

नागपूर : कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प हा समुद्र किनारपट्टीजवळील (कोस्टल) प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणला जाऊ शकत नाही. त्याऐवजी केवळ जमिनीवर होऊ शकणारा ‘इनलँड रिफायनरी’ प्रकल्प विदर्भासाठी मिळावा याकरिता तसा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार आशीष देशमुख यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. नाणार रिफायरनरीला कोकणवासीयांचा आणि शिवसेनाचा विरोध आहे. त्यामुळे तो प्रकल्प विदर्भात आणावा. समुद्र नसलेल्या अनेक ठिकाणी जगभरात आणि भारतातही अनेक रिफायनरी प्रकल्प आहेत. तेव्हा नाणार ऐवजी हा प्रकल्प विदर्भात झाला पाहिजे. यामुळे हजारो युवकांना रोजगार मिळेल, तसेच इंधन आणि इंधनावर आधारित इतर उत्पादन स्वस्त होतील, असे देशमुख म्हणाले.

आशिया खंडातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. यातून तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

तसेच सुमारे एक लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा सरकारचा आहे.  मात्र या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कोकणातील नागरिकांचा तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनाचा विरोध आहे. या मुद्यांवरून पावसाळी अधिवेशनाचे कामकाज तीन दिवस नीट होऊ शकले नव्हते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार देशमुख यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आणि कोकणवासियांचा विरोध असल्याने तो प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलने (वेद) अशाप्रकारच्या रिफायरीचे सादरीकरण चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर केले होते. त्यासाठी त्यांनी उमरेडजवळ किंवा गोंदिया जवळ जागा असल्याचे सांगितले होते, परंतु यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी अनुकूल नव्हते. आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस यांनी नाणारसारख्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याचे मान्य केले आहे.

निरोपाची भेट

ऐरवी सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे सरकार व विरोधक विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ओठांवर निखळ हास्य सजवून एकमेकांना भेटले. यावेळी अधिवेशनाचे शिवधनुष्य लिलया पेलल्याचे समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर दिसत होते तर शेतकरी कर्जमाफीपासून हमीभावापर्यंतच्या अनेक विषयांवर सरकारची कोंडी केल्याचे विजयी भाव धनंजय मुंडे व सुनील तटकरेंच्या चेहऱ्यावर विराजले होते.