उन्हाचा कडाका गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वाढला आहे. शेती-शिवारातील पाणी कमी झाले असून, बहुतांश ठिकाणी जलस्रोत आटले आहेत. अशा स्थितीत वनविभागाने जंगली प्राण्यांसाठी बांधलेले जिल्ह्यातील बहुतांश पाणवठेही कोरडेठाक असल्याचे चित्र समोर आले आहे.
जंगलातील प्राण्यांची पाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने जंगलात ठिकठिकाणी पाणवठे बांधण्याची संकल्पना वनविभागाने पुढे आणली. त्यानुसार २०११-१२, तसेच आजपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यातील तुळजाई-येडाई वनपट्टय़ात सुमारे ७६ पाणवठे बांधण्यात आले. तुळजापूर, भूम, उमरगा, लोहारा, उस्मानाबाद तालुक्यांमध्ये याची संख्या अधिक आहे. वनराईतील जमिनीला समतल मोठय़ा आकाराचे हे पाणवठे असून, वन्यप्राण्यांना त्यात अगदी सहज पाणी पिता येते.
जिल्ह्यातील विस्तीर्ण वनराईमध्ये ससा, हरिण, कोल्हा, लांडगा, तरस, बिजू, सायाळ आदी प्राण्यांसह मोर, घार, टिटवी, बहिरी ससाणा हे पक्षीदेखील मोठय़ा संख्येने वास्तव्य करून आहेत. परंतु या वन्यजीवांना उन्हाळ्यात प्यावयास पाणी मिळत नसल्यामुळे दूरदूर भटकंती करावी लागत होती. वन्यप्राण्यांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होत. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना अनेकदा या प्राण्यांची शिकारही होत असे. त्यामुळेच जंगलात पाणवठे बांधण्याची संकल्पना वनविभागाने राबविली. त्यानुसार जिल्हाभरातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील जंगलात ७६ पाणवठय़ांची निर्मिती वनविभागाने करवून घेतली. गावोगावी शेती-शिवारातील पाण्याचे सर्व स्रोत आटल्यानंतर वन्यप्राण्यांसाठी वनविभागाने बांधलेले पाणवठेच पिण्याच्या पाण्यासाठी तारणहार ठरले आहेत.
परंतु यंदा उन्हाळ्यात बहुतांश पाणवठय़ांत वनविभागाकडून पाणीच टाकले गेले नाही. तुळजापूर व वाशी तालुक्यांतील सर्वच पाणवठे कोरडेठाक आहेत. जिल्हाभर अनेक ठिकाणी अशीच स्थिती असली, तरी उपविभागीय वनअधिकारी कदम यांनी मात्र सर्वच ७६ पाणवठय़ांमध्ये पाणी सोडले असल्याचे सांगितले. परंतु केवळ उमरगा तालुक्यातील जंगलात असलेल्या पाणवठय़ात पाणी सोडल्याचे समजते. आश्चर्याची बाब म्हणजे वनविभागाच्या कनिष्ठ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाणवठय़ात पाणी सोडले की नाही, याची माहिती अजूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली नसल्याचेच यावरून उघड होत आहे. तुळजापूर तालुक्यातील पाणवठय़ात यंदा अजून पाणी सोडले नसल्याची माहिती वनरक्षक एम. बी. घोरपडे यांनी दिली. पाणवठय़ांमध्ये अवकाळी पावसामुळे जमा झालेले दूषित व गढूळ पाणी दिसून येत असून, वन्य प्राण्यांच्या आरोग्यास त्यामुळे धोका वाढला आहे.
पाणवठे साफ करून पाणी सोडणार
ज्या पाणवठय़ात पाणी सोडले नाही, त्यांची साफसफाई करून लवकरच पाणी सोडण्याचे आदेश देणार असल्याचे उपविभागीय वनअधिकारी कदम यांनी सांगितले.