24 November 2020

News Flash

सोलापुरात चोरीच्या आरोपाने व्यथित भाजी विक्रेत्या महिलेची आत्महत्या

नागूबाई सोमलिंग भीमदे  (रा. प्रतापनगर रोड, सोरेगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

सोलापूर : हातउसने दिलेले एक लाख मुदतीनंतरही परत दिले नाही, तर उलट चोरी केल्याचा खोटा आळ घालून बदनामी केली व असह्य़ छळ केल्यामुळे मन:स्ताप होऊन एका भाजी विक्रेत्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजापूर रस्त्यावरील सोरेगाव प्रतापनगर मार्गावरील एका शेतात हा आत्महत्येचा प्रकार घडला. याप्रकरणी दोन महिलांसह तिघाजणांविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नागूबाई सोमलिंग भीमदे  (रा. प्रतापनगर रोड, सोरेगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेणुका रमेश नरूणा (रा. सवेरानगर, सैपुल, विजापूर रस्ता), मंगला हेळकर व तिचा मुलगा जगन्नाथ हेळकर (रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) अशी या गुह्य़ातील आरोपींची नावे आहेत. मृत नागूबाई या काबाडकष्ट करून स्वत: च्या शेतात पिकविलेली भाजी सोलापुरात मंडईत विकून उदरनिर्वाह चालवित असे. परिश्रमाने कमावलेला पैसा तिने बचत करून ठेवला होता. दरम्यान, तिच्या ओळखीच्या रेणुका नरूणा व मंगल हेळकर यांनी तिच्याशी गोड बोलून आणि विश्वास संपादन करून स्वत:ची आर्थिक अडचण पुढे केली. तेव्हा सहकार्य करण्याच्या हेतूने नागूबाईने त्यांना एक लाखांची रक्कम हातउसने दिली होती.

ही रक्कम मुदतीनंतर परत देण्याचे ठरले होते. त्यानुसार मुदत टळली तरी हातउसने घेतलेली रक्कम परत मिळत नसल्याने नागूबाईने तगादा लावला. तेव्हा चिडलेल्या रेणुका व मंगला यांनी तिच्याशी भांडण काढले. विजापूर रस्त्यावरील सैफुल भाजीमंडईत नागूबाई दररोज भाजी विकण्यासाठी यायची. त्याठिकाणी रेणुका व मंगला यांनी तिच्यावर चोरीचा आळ घेतला. मंगला हिचा मुलगा जगन्नाथ यानेही तिला मारहाण केली. तर रेणुका हिने नागूबाई हिला पुन्हा भाजी मंडईत दिसली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. चोरीचा आळ घेतला गेल्याने नागूबाईला प्रचंड मानसिक धक्का बसला. आपली इभ्रत गेल्याचे वाईट वाटून तिला मन:स्ताप झाला. ती रात्रभर शेतात रडत बसली. नंतर याच मानसिक धक्क्यातून तिने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:04 am

Web Title: woman commit suicide due to accused of theft in solapur
Next Stories
1 आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेत
2 चालक परवान्यांचा ‘डेटाबेस’ सरकार तयार करणार
3 शासकीय घरकुल योजनेच्या लाभापासून अनेक कुटुंबे वंचित
Just Now!
X