राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्य़ात शनिवारी महिलेचा भूकबळी गेल्याने खळबळ उडाली आहे. ललिता शिवकुमार रंगारी (३६) असे मृत महिलेचे नाव असून बऱ्याच दिवसांपासून ती उपाशी होती.
ललिता तिरोडा शहरातील जगजीवनराम वॉर्ड, जुन्या वस्तीत राहत होती. आमदार विजय रहांगडाले यांचा हा प्रभाग आहे.  या दुर्दैवी घटनेनंतरही मृताच्या नातेवाईकांच्या सांत्वनाला जाण्याचे औचित्य नेत्यांनी दाखवले नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
ललिता विधवा होती. तिच्या पश्चात दोन  मुले आहेत.  त्यातील एकजण अंध आहे. दुसरा मुलगा मामाकडे शिक्षण घेत आहे. ललिता हिचे  पालनपोषण करणारा कोणी नसल्यामुळे ती काही दिवसांपासून उपाशी असल्याची माहिती १३ जूनला जुनी वस्ती तिरोडा येथील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘व्हॉटस एॅप’वर पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिली. ते या महिलेला काही मदत देतील, अशी आशा होती, मात्र तसे घडले नाही. वडिलांचे छत्र आधीच हरवून बसलेल्या दोन्ही मुलांना आईचा आधार होता. मात्र, आता आईचाच भुकेने बळी गेल्यामुळे दोन्ही मुले निराधार झालेली आहेत. ही बाब तिरोडाचे तहसीलदार रवींद्र चव्हाण व उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांना कळवूनही प्रशासनाकडून या घटनेकडे लक्ष दिले नाही. परिसरातील लोकांनी या घटनेची तक्रार तिरोडा पोलिस ठाण्यांत केली. महिलेचा मृत्यू भूकबळीनेच झाल्याची खात्री करण्याकरिता तिच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही बाब उघडकीस येताच शनिवारी सामाजिक न्यायमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुलगाही कुपोषित
रविवारी उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे व तिरोडा तहसीलदारांनी महिलेच्या घरी जाऊन याबाबतची चौकशी केली. महिलेच्या अंध मुलाला आकस्मिक निधीतून त्वरित ३० हजार रुपये उपलब्ध करून दिले. तसेच त्याच्या प्रकृतीचीही आज तपासणी करण्यात आली असून तोही कुपोषित असल्याचे आढळले. त्याला रविवारी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.