कारखान्यात कामगाराचा अपघाती मृत्यू

चंद्रपूर : छतावरून पडल्याने युवतीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास गिरनार चौकातील पोलीस वसाहतीत घडली. गौरी सुनील बद्दलवार (१८) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर घुग्घुस येथे लॉयड मेटल्स कारखान्यात झालेल्या अपघातात भोला पचारे (४८) या कामगाराचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला होता.

शहरातील गिरनार चौकात पोलिसांसाठी आकर्षक वसाहत निर्माण करण्यात आल्या आहेत. या वसाहतीत अनेक पोलीस कुटुंब वसाहतीला आहेत. रामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुनील बद्दलवार कुटुंबासह येथे राहतात. त्यांची मुलगी गौरी गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी सातव्या मजल्यावरील छतावर गेली होती. मात्र तोल गेल्याने ती खाली पडली. तिला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी पंचनामा करून मार्ग दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

तर घुग्घुस येथील लॉयड मेटल्स कंपनीत गुरुवारी दुपारी भोला पचारे (४८) या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. पचारे हे कन्व्हेअर बेल्ट जवळ काम करीत होते. त्याचवेळी अचानक हात मशीनमध्ये अडकल्याने ते पूर्णत: मशीनमध्ये ओढले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीय व कामगारांनी ६० लाखांची आर्थिक मदत मिळणार नाही तोवर मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली. कामगारांचा रोष व तणाव बघता कंपनी व्यवस्थापनाने ५५ लाखांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला.