जावळी तालुक्यातील दुर्गम अशा कांदाटी खोर्‍यातील एका मातेने असह्य वेदना सहन करत बाळाला चक्क बोटीतच जन्म दिला. रात्रीच्या अंधारात बोटीवर जात प्रसुती करणाऱ्या डॉक्टर ज्ञानेश्वर मोरे यांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून याबद्दल गावातील महिलांनी त्यांचा सत्कार केला.

कोयना जलाशयाच्या कांदाटी भागातील पिंपरी तर्फ तांब जगताब या छोट्याशा गावातील एकता जाधव यांना रात्रीच्या वेळी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. जवळपास कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या.त्यांना होणारा त्रास पाहून कुटुंबीयांनी तातडीने कोयना जलाशयातून बोटीतून बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात नातेवाईक बोटीतून प्रवास करीत बामणोली येथील जलाशयाच्या काठावर पोहोचले.

रुग्णाला चालणे ही शक्य नसल्याची माहिती बरोबर असलेल्या नातेवाईकांनी बामणोली आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानेश्वर मोरे यांच्या पर्यंत पोहोचवली. त्यांना परिस्थितीची माहिती दिली. यानंतर लगोलग डॉ मोरे,परीचारिका पडवी, पवार या स्वतः अंधारातून मार्गक्रमण करीत या बोटीवर आले. रुग्णाला हलविणे शक्य नसल्याने त्यांनी बोटीतच एकता जाधव यांची सुखरूप प्रसूती केली.

प्रसूतीनंतर त्यांनी माता आणि बाळाला सुरक्षितपणे आरोग्य केंद्रात दाखल केले. रात्रीच्या अंधारात बोटीवर जात प्रसुती करणाऱ्या डॉ ज्ञानेश्वर मोरे यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत असून याबद्दल गावातील महिलांनी त्यांचा सत्कार केला