नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या केवळ पोलिसांनाच अतिविशिष्ट उपचार मिळतील, या गृहखात्याच्या धोरणाचा फटका एका गरीब महिलेला बसला आहे. केवळ पोलिसांच्या उपस्थितीमुळे जखमी व्हावे लागलेल्या या महिलेला चांगल्या उपचारापासून वंचित राहावे लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यात शुक्रवारी गट्टा पोलीस ठाण्याजवळच्या हॉटेलात बसलेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात एका उपनिरीक्षकासह हे हॉटेल चालविणारी कृष्णा डे ही महिला गंभीर जखमी झाली. या दोघांना पोलिसांनी उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला आणले. नागपुरात मात्र पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांना उपचाराच्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात. मांडीला गोळय़ा लागल्यामुळे या महिलेच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. मात्र, या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी सुमारे पाच तास या महिलेकडे लक्ष दिले नाही. तिच्यावर आवश्यक असलेली शस्त्रक्रिया करायलासुद्धा डॉक्टर तयार नव्हते.
अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी धावपळ केल्यानंतर रात्री उशिरा उपचार सुरू झाले. तिकडे खाजी रुग्णालयात दाखल पोलीस अधिकाऱ्यावर मात्र वेळेत उपचार झाले. एकाच घटनेत जखमी झालेल्या या दोघांच्या उपचाराच्या बाबतीत हा भेदभाव कशासाठी? असा प्रश्न यातून उभा ठाकला आहे. या प्रश्नाचे उत्तर गृहखात्याच्या धोरणात दडले आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांवर अतिविशिष्ट उपचार व्हावे यासाठी गृहखात्याने महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील नामवंत खाजगी रुग्णालयांशी करार केले आहेत. या करारानुसार केवळ पोलिसांना उपचार मिळू शकतात. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सामान्यांचा गृहखात्याने विचारच केला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. नक्षलवादी व पोलिसांमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेकदा सामान्य नागरिक जखमी होतात. त्यांच्या उपचाराची जबाबदारी शासनाने घेण्यास काहीच हरकत नाही, असे मत एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आज ‘लोकसत्ता’जवळ व्यक्त केले. गट्टा पोलीस ठाण्याजवळ हॉटेल चालवणारी ही महिला केवळ पोलीस तिच्या हॉटेलात हजर होते म्हणून जखमी झाली. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गट्टा गावात पोलिसांना कोणताही हॉटेल चालक जेवणसुद्धा देत नाही. अशा स्थितीत गेल्या काही वर्षांपासून या महिलेने पोलिसांना जोखीम पत्करून जेवण देणे सुरूच ठेवले होते. या महिलेची दोन तरुण मुलेसुद्धा पोलिसांना नेहमी मदत करतात. नक्षलवाद्यांचा सदैव वावर असलेल्या गावात पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेणाऱ्या या महिलेला केवळ गृहखात्याच्या विचित्र धोरणामुळे चांगल्या उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या महिलेची आर्थिक स्थितीसुद्धा कमालीची नाजूक आहे.
 या महिलेवर चांगले उपचार व्हावेत, अशी स्थानिक अधिकाऱ्यांची भावना आहे. मात्र खात्याच्या धोरणामुळे काही करता येत नाही, अशी खंत अधिकारी बोलून दाखवतात. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या युद्धात सामान्य नागरिक जखमी होण्याचे प्रमाण कमी असले तरी अशी घटना घडलीच तर गृहखात्याने धोरणात बदल करणे आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त होत आहे.