कोल्हापुरातल्या तकणंगले तालुक्यातील प्राईड इंडिया को-ऑप. टेक्स्टाईल पार्क मधील वस्त्र उद्योजकांचे कारखाने थकबाकीच्या कारणावरुन सील केले जाऊ लागल्याने गुरुवारी संतप्त कारखानदारांनी संस्थेत जाळपोळ, मोडतोड करत आपला रोष व्यक्त केला . अन्यायी पद्धतीने सुरु असलेली कारवाई थांबवावी , अशी मागणी करत कामगार व कारखानदारांनी एकत्रित येऊन संस्थेच्या प्रवेशद्वारात टायर पेटवले तसेच रास्ता रोको करून वाहतूक बंद पाडली. कामगारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अन्य कारखान्यांना सील करण्याची प्रक्रिया थांबवणे भाग पडले . पोलिसांसमोर उद्योजकांचा रुद्रावतार सुरु राहिला . याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांसमवेत उद्योजकांची बैठक सुरु आहे .

तारदाळ (ता. हातकणंगले) येथील प्राईड इंडिया को-ऑप. टेक्स्टाईल पार्क मधील वस्त्र उद्योजकांचे कारखाने बुधवारपासून थकबाकीच्या कारणावरुन सील केले जात आहेत . या प्रकल्पातील कारखाने, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत यासह सर्वप्रकारचे बांधकाम करण्याचे काम आयएल अ‍ॅन्ड एफएस या कंपनीकडे सोपविण्यात आले होते. या कंपनीने कर्जवसुलीचे अलीकडे काम एका अन्य संस्थेकडे सोपविले आहे. या कंपनीने काल जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीस बंदोबस्तात १०० पैकी १२ कारखान्यांना सील करण्यात आले .

या कारवाईमुळे संस्थेतील कारखानदार , कामगार उद्योग बंद पडण्याच्या भीतीने आज एकत्र आले . त्यांनी आज भर पावसात संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ एकतरी येऊन रास्ता रोको आंदोलन सुरु केले . काहींनी टायर पेटवून जाळपोळ  सुरू केली . काहींनी दगडफेक केली . कारवाई साठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा करत कारवाईला विरोध दर्शवला . २०० वर कारखानदार , कामगार यांनी आक्रमकपणे आंदोलन चालवल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला .

त्यामुळे पोलिसानांही काय करावे हे सुचेना . कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घातली . त्यांना इचलकरंजीचे प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचे मान्य केले . त्यानुसार प्रांत , कारखानदार , कामगार आणि कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक सुरु आहे. कारखानदारांना थकबाकी भरण्यासाठी आठवड्याची मुदत दिली जाईल, असा प्रस्ताव चर्चेत आला होता, त्यावर एकमत करण्याचे काम सुरु होते . तर , काही कारखानदारांनी संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे .