पत्रकारितेचा वसा ज्या काळात सुरू झाला तो काळ पारतंत्र्याचा होता. स्वातंत्र्याच्या चळवळीला पत्रकारितेमुळे मोठे पाठबळ मिळाले. त्यानंतर काळानुरूप पत्रकारितेत बदल होत गेले आणि त्या काळच्या पत्रकारितेतील विश्वासार्हता निर्माण करण्याचे आव्हान आता पत्रकारांसमोर आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केले. प्रसार माध्यमातील नव्या तंत्रज्ञानाच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारितेची वैभवशाली परंपरा जोमाने पुढे नेणारी पिढी घडविण्यासाठी विभागीय कार्यशाळेची खरी गरज असून, अशा कार्यशाळांच्या माध्यमातून पत्रकारांनी नवीन प्रवाहांवर मंथन करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, महाराष्ट्र राज्य संपादक सहकारी संघ व बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण विभागीय मराठी कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी तटकरे बोलत होते. येथील स्वयंवर मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या शिबिराला पालकमंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष राजाभाऊ लिमये, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रशीद साखरकर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, विजय मांडके आदी उपस्थित होते.
तटकरे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारितेने जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे केल्यानेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य चळवळीला तमाम जनतेची चळवळ करण्यात वृत्तपत्रांचे योगदान मोठे होते. वृत्तपत्रांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमानाचा विचार रुजवून स्वातंत्र्य चळवळीला मोठा आधार दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही पत्रकारितेने मौलिक योगदान दिले. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या सर्वागीण विकासासाठी जनतेला प्रेरित करताना लोकशाही मूल्ये जपण्याचे कार्य पत्रकारितेने केले आहे. राज्याच्या उभारणीतही पत्रकारितेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे तटकरे म्हणाले.
बदलत्या काळानुसार माध्यम क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आले आहे. वृत्तवाहिन्यांची संख्या वाढल्याने वृत्तपत्रसृष्टीसमोर आव्हान उभे राहील असे वाटले होते. मात्र ध्येयनिष्ठ पत्रकारांच्या लिखाणामुळे वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही टिकून आहे. नवमाध्यमांमुळे वेग वाढला असताना दुसरीकडे भविष्याचा वेध घेत समाजाला विचार देणारी पत्रकारिता टिकविण्यासाठी मंथन होणे गरजेचे आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांचे आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. राज्याचा विकास करताना वृत्तपत्रे मार्गदर्शनाचे कार्य करतात, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, पत्रकारांना कोणतीही मदत लागली तरी राजकारण बाजूला ठेवून मी त्यांच्या चार पावले पुढे असेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी रवींद्र बेडकीहाळ, राजाभाऊ लिमये यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद पिलणकर यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी राजीव जाधव, माजी न्यायाधीश भास्कर शेटय़े, जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे, अभिजित हेगशेटय़े, जावेद मुजावर, प्रभाकर कासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, बाबाजी जाधव, गजानन पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजन शेटय़े, तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह अन्य जिल्ह्य़ांतील विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.