28 February 2021

News Flash

Election 2019 : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये गटबाजीची डोकेदुखी

सेना-भाजपमध्ये युती झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिलासा मिळाला.

प्रबोध देशपांडे

शिवसेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भातील यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात युती व आघाडीमध्ये तुल्यबळ लढत रंगण्याचे संकेत आहेत. सेना-भाजपमध्ये युती झाल्याने शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना दिलासा मिळाला. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघात शिवसेना व काँग्रेसमध्ये थेट सामना होणार असून, दोन्ही पक्षांतील अंतर्गत गटबाजी थोपविण्याचे मोठे आव्हान उमेदवारांपुढे राहील.

यवतमाळ जिल्हय़ातील चार आणि वाशिम जिल्हय़ातील दोन विधानसभा मतदारसंघ मिळून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. पूर्वीच्या वाशिम व पुनर्रचनेनंतर आत्ताच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी सलग गत २० वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१४च्या निवडणुकीत भावना गवळी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८६१ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी मोदी लाटेसह विविध ‘फॅक्टर’ होते. आता बरीच समीकरणे बदली आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मतदारसंघात शिवसेनेने सुरुंग लावून अभेद्य गड निर्माण केला. काँग्रेसने विविध प्रयोग करूनही त्यांना यश मिळाले नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बंजारा, आदिवासी, दलित, मुस्लीम व मराठा समाजाचे प्राबल्य आहे. बंजारा समाजाची निवडणुकीत निर्णायक भूमिका ठरू शकते. मतदारसंघात शेतकरी आत्महत्या, शेतीचे प्रश्न, कापूस प्रक्रिया उद्योग, औद्योगिक विकासाचा अभाव, बेरोजगारी आदी प्रश्न आहेत.

राज्यात गत काही महिन्यांमध्ये शिवसेना-भाजपच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा केली जात होती. युतीमध्ये शिवसेनेच्या वाटय़ातील मतदारसंघात भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली. भाजपकडे इच्छुकांची मोठी यादी होती. मात्र, आता युतीची घोषणा झाल्याने तो विषय संपला आहे. भाजप-शिवसेना युतीकडून पुन्हा एकदा खासदार भावना गवळी निवडणूक रिंगणात उतरतील. काँग्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. माणिकराव ठाकरे यांचे तिकीट जवळपास निश्चित समजले जात असून, आघाडीच्या पहिल्या यादीतच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचे प्रा. प्रवीण पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मतदारसंघाच्या परंपरेनुसार शिवसेना-काँग्रेसमध्येच सरळ लढत होईल. पक्षांतर्गत मतभेद व नाराजी दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते.

गत काळात खासदार भावना गवळी व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगली. खासदार व मंत्र्यांमध्ये अगदी टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे शिवसेना देखील गटातटात विभागली गेली. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर थेट ‘मातोश्री’ला या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी खासदार व राज्यमंत्र्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता कुठलेही मतभेद नसल्याचा दावा भावना गवळी यांनी केला. दुसरीकडे माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीलाही यवतमाळ जिल्हय़ात काँग्रेस पक्षांतर्गत विरोधाचा सूर आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी बंजारा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याने ठाकरेंच्या अडचणीत भर टाकली. सेना व काँग्रेसच्या उमेदवारांना अंतर्गत गटबाजी व नाराजी रोखून प्रतिस्पर्धी उमेदवाराशी सामना करण्याची तारेवरची कसरत करावी लागेल. सोबतच मतदारसंघातील भाजप व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारासाठी किती काम करतील, यावरही प्रश्नचिन्ह आहेच. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शिवसेनेच्या भावना गवळी या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आता तुल्यबळ लढत होणे जवळपास निश्चित असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड या तीन हजार कोटींच्या रेल्वेमार्गाचे काम मार्गी लागले. भूसंपादन वेगाने झाले असून, दीड वर्षांत काम पूर्ण होईल. मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला गाडीचा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याच्या दोन हजार कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली. ब्रिटिश कंपनीसोबत करार झाल्यावर कामाला सुरुवात होईल. बंजारा समाजाची काशी पोहरादेवी हे तीर्थक्षेत्र रेल्वेमार्ग व महामार्गाला जोडण्याचे काम सुरू आहे. भाविकांना सुविधा होऊन मानोरा तालुक्यालाही लाभ होईल. अकोला-पूर्णा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मंजूर झाले. महामार्ग, रेल्वेमार्गाची १०० टक्के कामे मार्गी लागली. नोकरी महोत्सवातून युवकांना रोजगार मिळवून दिला. आता वाशीम-माहूर, बडनेरा-खामगाव रेल्वेमार्ग, औद्योगिक विकास, यवतमाळ येथे मंजूर असलेला टेक्सटाइल्स पार्क सुरू करण्यासह भरीव निधी आणण्याचे प्रयत्न राहतील.

– भावना गवळी, शिवसेना खासदार

केंद्रात व राज्यात शिवसेना सत्तेत असताना मतदारसंघातील कामे मार्गी लागली नाहीत. कामांच्या बाबतीत प्रचंड उदासीनता आहे. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे खासदारांविषयी मतदारांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते. शेतीचे अनेक प्रश्न कायम आहेत. शेतमालाला भाव नाही. सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत आहेत. शेतमालावर प्रक्रिया उद्योग, औद्योगिक वसाहतीत उद्योग-धंद्याचा अभाव जाणवतो. युवकांना नोकरी नसून मतदारसंघात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले. यूपीए शासनाच्या कार्यकाळात १०-११ वर्षांपूर्वी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग मंजूर झाला. मात्र, अद्यापपर्यंत त्याचे काम मार्गी लावण्यात यश आले नसून प्रकल्प ठप्प पडला आहे. केवळ खोटी आश्वासने दिली जात असल्याने जनतेचा भ्रमनिरास झाला.

– माणिकराव ठाकरे, काँग्रेस नेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 2:31 am

Web Title: yavatmal washim lok sabha constituency shiv sena congress
Next Stories
1 शरद पवार यांची माढय़ातून उमेदवारी जाहीर
2 पोलीस उपनिरीक्षकाचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
3 आंदोलकांची धरपकड
Just Now!
X