16 November 2019

News Flash

आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सुरु – संजय राऊत

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती

संग्रहित छायाचित्र

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी सध्या सुरु आहेत असं सूचक विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त होती. दरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

आदित्य ठाकरे राज्याचं नेतृत्त्व करणार का असं विचारलं असता संजय राऊत यांनी सांगितलं की, ‘उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरु आहे’.

यावेळी संजय राऊत यांनी लोकसभेचं उपाध्यक्षपद अजिबात मागितलं नव्हतं असा दावा केला. आम्ही त्या पदावर शिवसेनेचा नैसर्गिक अधिकार आहे असं सांगितलं होतं, दावा केलेला नव्हता. एखाद्या गोष्टीची इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही. लोकसभेचं उपाध्यक्षपद कोणलाही देऊ देत असं ते यावेळी म्हणाले.

First Published on June 12, 2019 3:46 pm

Web Title: yuvasena aditya thackeray lead mahrashtra shivsena sanjay raut sgy 87