महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांचा उद्या शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची ते शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल.

गुरुवारी शिवाजी पार्क मैदानात उद्धव ठाकरेंसह १५ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. उद्धव ठाकरेंसोबत पाच मंत्र्यांचा शपथविधी व्हावा अशी शिवसेनेची भूमिका होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला निश्चित होईल.

काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. काल ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत एकमताने उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या संबंधी मांडलेल्या प्रस्तावाला तिन्ही पक्षांनी अनुमोदन दिले.