राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आता शिवसेनेच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत उद्या दिल्लीत सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, राज्यपालांच्या निमंत्रणानंतर बैठकीसाठी शिवसेना नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. हॉटेल रिट्रिट येथून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, मिलींद नार्वेकर यांच्यासह अन्य शिवसेना नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत. तर उद्या दुपारी तीन वाजता संजय राऊत दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर दुसरीकडे जयपूरमधील बैठकीनंतर आता काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच शिवसेनेला पाठिंब्याबतची काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणार आहे.

सत्ता स्थापन करण्यास भाजपानं असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. उद्या (११ नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, शिवसेना सत्ता संपादनासाठी बहुमताचा आकडा कसा जुळवणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सणसणीत टोला लगावला आहे. “कालपर्यंत भाजपाचं नेतृत्व सांगत होतं की, मुख्यंत्री भाजपाचाच होणार. पण, भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर मुख्यमंत्री कसा होणार,” असा सवाल करत “कोणत्याही किंमतीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,”असा दावा राऊत यांनी केला आहे.