राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. या निवडीमुळे अजित पवार विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे नेते असतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाची भुमिका मांडली. ते म्हणाले, “मोदी आणि शाह यांनी ३७० कलमाचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचारादरम्यान रेटला मात्र, आम्ही जनतेचे मुद्दे मांडले. जनजागरण करुन लोकांना याबाबत सांगण्याचे काम अमोल कोल्हे आणि अमोल मिठकरी यांनी केले. त्याचबरोबर सर्वात कमी जागा लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला. पक्षाला नवी ऊर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले.

यावेळी जयंत पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांवर सडकून टीका केली. पक्ष बदलून नाही तर मनं बदलून लोकांची मतं जिंकायची असतात असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर जनतेला मान्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं, असे ते म्हणाले.

विदर्भ भाजपाचा बालेकिल्ला समजला जायचा तो आता त्यांचा राहिला नाही. कारण, तिथं १२ पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. यावरुन विदर्भातील जमीन भुसभुशीत आहे पुढील वेळी तिथं विशेष लक्ष घातले तर १६ ते १७ आमदार आपण निवडून आणू शकतो. तसेच नगरमध्ये १२ पैकी ६ आमदार राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले. हे सर्व पहिल्यांदा निवडणूक लढले आणि निवडून आले नगरने नव्या चेहऱ्यांना संधी दिली ही चांगली बाब आहे. मात्र, इथले काही लोक राष्ट्रवादीला बारांपैकी शून्यावर आणू अशी भाषा करत होते ते तोंडावर पडले, असा टोला यावेळी पाटील यांनी खासदार सुजय विखे यांना मारला.